अमेरिकेत रंगला आषाढी वारीचा रिंगण सोहळा

न्यू जर्सीत विठ्ठल भक्तीची पायाभरणी

अमेरिकेत रंगला आषाढी वारीचा रिंगण सोहळा

थेट न्यू जर्सी अमेरिकेतून / प्रवीण पाटील 

अमेरिकेतील न्यू जर्सीतील पपैन्नी पार्क येथे आषाढी वारी निमित्ताने रिंगण सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तीभावाच्या  वातावरणात संपन्न झाला. दिंडी सोहळ्यात न्यू जर्सी राज्यातील सुमारे ५०० हून अधिक भाविकांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केलेला होता. रिंगण सोहळ्यासाठी हे भाविक  एकत्र जमले होते. ढोल ताशांच्या गजरात दिवसभर हा सोहळा सुरू होता. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये मराठी अस्मितेचा भगवा मानाने डौलत होता तर दिंडीमध्ये मराठी तरुणाई हरिनामाच्या गजरात ताल धरत होती.

   रिंगण सोहळा आणि दिंडी निघण्याआधी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक अतुल भावे यांचे हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर आरती व महाप्रसाद झाला. लेझीम पथकाने या सोहळ्याचे आकर्षण वाढवले. भारतातील सर्वच संतांच्या नावे वेगवेगळ्या दिंड्यांनी तेथे आपले अविष्कार घडविले. अमेरिकेत आतापर्यंत विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नव्हते.  न्यू जर्सी मध्ये हे मंदिर महाराष्ट्रीयन तरुणाच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे . पंढरपूरहून मागवलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची तेथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.   भारतीय भक्ती आणि संस्कार सातासमुद्रापार पोचविण्याचा प्रयत्न न्यू जर्सीमधील तीन मराठी उद्योजक आनंद चौथाई, प्रवीण पाटील आणि  भाऊ कुलकर्णी यांनी केला आहे. अमेरिकेतील चित्रा भावे आणि राजश्री कुलकर्णी यांनी आळंदी ते पंढरपूर वारीचा अनुभव घेतलेला असल्याने अमेरिकेत वारी सुरू करावी अशी संकल्पना पुढे आली आणि त्याला वारकऱ्यांच्या दिंडीने मूर्त रूप मिळाले. अमेरिकेतील मैदानांमध्ये आणि उद्यानांमध्ये हरीपाठाचा गजर होऊ लागला. २४ जून रोजी ज्ञानोबा तुकाराम... जय हरी विठ्ठल आणि राम कृष्ण हरी नाम संकीर्तनात फार मोठे रिंगण धरण्यात आले.निरंजन देव यांच्या नेतृत्वाखाली २५ स्वयंसेवक तसेच राजश्री कुलकर्णी आणि त्यांच्या लेझीम पथकाने ,सारिका कदम व त्यांच्या साथीदारांनी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून रिंगणाचा मनोहारी नयनरम्य सोहळा यशस्वी केला. याकार्यक्रमासाठी न्यू जर्सी येथील पाचशे पेक्षा अधिक मराठी भाविक सहभागी झाले होते.

    

 अमेरिकेत मराठी माणसांनी विविध क्षेत्रात ठसा उमटविला असून आता विठ्ठल भक्तीची, वारकरी संप्रदायाची आणि वारीची चे मुहूर्तमेढ रोवली आहे. 

-----जे डी पाटील माजी प्राचार्य, जामनेर (जि जळगाव)