रावेरात पुराचे पाणी घरात घुसल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू
बेपत्ता व्यक्तीचा १२ तास उलटूनही शोध जारीच
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरातील नागझिरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घरात घुसल्याने या पाण्यात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मोरव्हाल येथील एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एक जण बेपत्ता आहे. शोध मोहीमेला १२ तास उलटूनही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागलेला नाही. तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे शोध मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
बुधवारी रात्री रावेर तालुक्यात व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सुकी, नागझिरी, अभोडा येथील नदीला पूर आला. या पुरात तीन जण वाहून गेले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळून आले आहेत.
घरातच बुडून मृत्यू
नागझिरी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसले. घरसमान ओला होऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी हलविताना एका ५५ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झाला आहे. तालुक्यात २४.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १४५ घरांचे नुकसान झाले असून २० गुरे वाहून गेली आहेत. शहरातून जाणारा जुना सावदा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.