BREAKING : शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षणाधिकारी वसुलीला : साडेअकरा वाजेपर्यंत कार्यालय कुलुपबंद : आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला धरले धारेवर
सक्तीच्या वसुलीने शिक्षक त्रस्त
प्रतिनिधी/रावेर
देशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण विभागाची लक्तरे रावेरचे गट शिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांनी वेशीवर टांगली आहेत. शाळा तपासणीच्या नावाखाली शिंदे दररोज शाळेवर व्हिजीटला जात असून यामाध्यमातून शिक्षकांकडून सक्तीची आर्थिक वसुली करण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत. याची खातरजमा करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या आवारातील शिक्षण विभागाला भेट दिली असता तिथे सर्व विभाग कुलूप बंद स्थिती आढळले. याची माहिती आमदार अमोल जावळे यांना दिल्यावर त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व गटविकास अधिकारी विनोद मेढे यांना याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले.
गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्या मनमानी कारभाराबाबत व शिक्षकांकडून शाळा तपासणीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत तालुक्यातील शिक्षकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. कार्यालयाची शासकीय वेळ साडेनऊची असतांना साडेअकरा वाजेपर्यंत कार्यालय कुलुपबंद अवस्थेत होते. तर आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी व शैक्षणिक कामानिमित्त कार्यालयाबाहेर १० ते १५ महिलापुरुष ताटकळत उभे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना कार्यालय कुलुपबंद असल्याबाबत विचारण केली असता धामोडी येथे शाळा तपासणीसाठी आल्याचे सांगितले. धामोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रतिनिधी पाठवून श्री शिंदे आहेत का ? याचा तपास केला असता ते या शाळेवर आढळले नाही. तर बाकीचे शिक्षण विस्तार अधिकारी व कर्मचारी कुठे गेले असे विचारले असता तेही शाळा व्हिजिटला गेले असल्याचे सांगितले. ही बाबत आमदार अमोल जावळे यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच गटविकास अधिकारी विनोद मेढे यांना कॉल करून शिंदेंच्या कारभाराबाबत चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले.
अधिकारी वसुलीवर कार्यालय वाऱ्यावर
गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून शाळा तपासणीच्या नावाखाली वसुलीला जात असून ऐन परीक्षा काळात कोणती शाळा तपासणी केली जाते असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्या कारभाराबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेवून त्यांना निलंबित करण्याची मागणी आमदार अमोल जावळे जिल्हा परिषदेच्या मुळ्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोमवारी लेखी तक्रारीद्वारे करणार आहे.
उद्या वाचा : "साहेब"रावांची साहेबगिरी

krushisewak 
