BREAKING : पातोंडीच्या दोघांचे काळे कारनामे : रक्कम हडपण्यासाठी नामी शक्कल : पीक विमा काढला दुसऱ्याच्या नावावर, उतारा दिला तिसऱ्याचा
घोटाळ्यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा रावेरला इशारा
प्रतिनिधी / रावेर
केळी पीक विम्याच्या आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे संपता संपत नसल्याची स्थिती आहे. या योजनेचा प्रत्यक्षात केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसताना याचा फायदा मात्र मोठ्या प्रमाणावर दलालांनी घेतला आहे. पातोंडी (ता रावेर) येथील सिंडिकेट असलेल्या दोघांनी शक्कल लढवीत दुसऱ्याच्या नावावर पीक विम्याचे प्रकरण केले. यासाठी तिसऱ्याच शेतकऱ्याचा परस्पर केळी लागवडीचा उतारा देत पीक विम्याचा लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे काल रावेर येथे एका बैठकीसाठी आले असता त्यांनी पीक विमा घोटाळ्यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सिंडिकेटसह या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाईची अधिक शक्यता असून सिंडिकेट म्हणून पीक विमा योजनेत कार्यरत असलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यात केळी लागवड करणारे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असतांना या योजनेत सक्रिय असलेल्या दलालांनी मात्र शासनाचा लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे. या योजनेतील दलालांचे आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे दररोज नव्याने उजेडात येत आहेत. शेतकरी नसताना या विम्याचा लाभ घेण्यासाठी पातोंडी येथील दोघांनी परस्पर दुसऱ्याच्या नावावर पीक विमा काढल्याचा प्रकार घडला आहे. यासाठी त्यांनी तालुक्यातील कुसूंबा येथील शेतकऱ्याला थांगपत्ता लागू न देता त्याच्या जमिनीचा सातबारा उतारा परस्पर देऊन (उचंदा ता मुक्ताईनगर) येथील नातेवाईक युवकाच्या नावावर पीक विमा काढून हा काळा कारनामा केला आहे. पीक विम्याचा आर्थिक लाभ घेण्यासाठी या दोघांनी वापरलेली नामी युक्ती मात्र सपशेल फसली असून यामुळे मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली आहे. पीक विम्याची रक्कम हडप करताना या युवकाला "हर्ष" झाला असला तरी आता मात्र पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे.
विवऱ्याचा महाठक "तो मी नव्हेच" च्या भूमिकेत
विवरा बुद्रुक येथील एकाने रहिवाशी जागेवर (एन ए प्लॉटवर) पीक विम्याचा लाभ घेतल्याचा प्रकार काल उघडकीस आल्यावर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापासून विवरा परिसरात या प्रकाराची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. प्रकरण आपल्या अंगाशी येत असल्याचे पाहून या व्यक्तीने बातमी आल्यानंतर धावपळ सुरु आहे. महाठकाने हा महाप्रताप केल्यावर "तो मी नव्हेच" या भूमिकेतून कृषी विभाग, विमा कंपनी व संबंधित बँकेत स्वतःची बाजू सावरण्यासाठी प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, एन ए गट नं 1059 वर विमा घेणाऱ्या विरुद्ध या भागातील नागरीक एकवटले असून या प्रकरणाची चौकशी करून शासनाची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तहसीलदार व पोलिसांकडे निवेदन देऊन करणार असल्याची चर्चा आहे.
सर्व दोषींवर गुन्हे दाखल होणार
केळी पीक विमा योजनेची कृषी विभाग, विमा कंपनी व पोलीस विभागातर्फे कसून चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये दोषी आढळणारे शेतकरी, विमा प्रतिनिधी, सिंडिकेट, दलाल, एजंट व ज्यांचा यात संबंध असेल अशा सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बुधवारी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीनंतर दिला आहे.

krushisewak 
