डॉ. विनायक शिंदे यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी पाच पुरस्कार जाहीर

डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी होणार गौरव

डॉ. विनायक शिंदे यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी पाच पुरस्कार जाहीर

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

तळसंदे(कोल्हापूर) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि प्रभारी परिक्षा वरिष्ठ पर्यवेक्षकपदी कार्यरत असलेल्या डॉ. विनायक शिंदे यांची कृषि शिक्षणामध्ये नवनविन प्रयोग व शेतकरी उपयोगी संशोधन आणि कृषी विस्तार कार्यासाठी विविध पाच राष्ट्रीय पुरस्कारांकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, महात्मा गांधी राष्ट्रिय अभिमान पुरस्कार, भारत विभूषण, भारत गौरव सन्मान तसेच नॅशनल प्राईड अ‍ॅवार्ड इत्यादी सन्मानांचा समावेश आहे. सप्टेंबर ते डिसेंबर-2023 दरम्यान देशातील विविध शहरांमध्ये अयोजित समारंभांमध्ये डॉ. शिंदे यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

डॉ. शिंदे हे शेतीवरिल प्रात्यक्षिके, स्वनिर्मित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, विडिओ, डेमॉन्स्ट्रेशन्स, इत्यादी माध्यमांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी गोडी निर्माण करतात. यासह आंबा जाती, प्रक्रिया आणि साठवणूक; पेरु फळ पिकातील छाटणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, द्रावणांचा मुरमाड जमिनीवर होणारा परिणाम तसेच होमिओपॅथिक औषधांचा भाजीपाला पिकांच्या वाढीवर आणि गुणवत्तेवर होणारे परिणाम यावर त्यांनी शेतकरी उपयुक्त संशोधन केलेले आहे. गेल्या बारा वर्षांपासून कृषि विस्तार क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य असून सात वर्षांपुर्वी ‘कृषिसमर्पण फाऊंडेशन’ या नऊ लाखांपेक्षा अधिक फ़ॉलोवर्स असलेल्या सामाजिक संस्थेची स्थापना केली व सोशल मीडियांचा प्रभावी वापर करत शेतकर्‍यांमध्ये कृषिसाक्षरता वाढविण्याकरिता प्रकाशने, कार्यशाळा इत्यादीद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषिसमर्पण फाऊंडेशनने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली असून फाऊंडेशनची स्वत:ची स्वतंत्र्य वेबसाईट, एंड्रोईड अ‍ॅप, ब्लॉग, फेसबूक ग्रुप, युट्युब चॅनल, इत्यादी सक्रिय आहेत. यासह शेतकरी फसवणूक विरोधामध्ये ते नेहमी लढा देत असतात.

कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याकरिता त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रिय, विभागीय तसेच प्रादेशिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या यशाकरिता संस्थेचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार रुतुराज पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, संशोधन अधिष्ठाता डॉ. मुरली भुपती, प्रभारी संशोधक संचालक डॉ. संदिप वाटेगावकर, कृषि अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे आणि प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.