राजकारण : रावेरला तिरंगी लढतीची शक्यता : उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिका परिसराला यात्रेचे स्वरूप

नगराध्यक्षपदासाठी 21 तर नगरसेवक पदासाठी 218 अर्ज दाखल

राजकारण : रावेरला तिरंगी लढतीची शक्यता : उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिका परिसराला यात्रेचे स्वरूप

 प्रतिनिधी/रावेर

रावेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार गट) व महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण 21 तर नगरसेवक पदासाठी 218 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावाचा भाजपतर्फे असलेला सस्पेन्स अखेर आज शेवटच्या दिवशी संपला. नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे संगीता भास्कर महाजन यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. यामुळे नगरपालिका परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 21 तर नगरसेवक पदासाठी 218 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  

नगराध्यक्ष पदासाठी आज(दि.१७) 8 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 97 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज संपलेल्या मुदतीअखेर नगरध्यक्ष पदासाठी एकूण 21 अर्ज दाखल झालेले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 12 प्रभागातून आजपर्यंत एकूण 218 अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत प्रथमच तरुण व नवख्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश दिसून येत आहे. तर जुन्या प्रस्थापितांची यावेळी कसोटी लागणार आहे.भाजप, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक अटीटतीची होण्याची शक्यता आहे. तिरंगी होणाऱ्या या निवडणुकीने परस्परांसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत असून खरी वस्तुस्थिती माघारीनंतर समोर येईल. भारतीय जनता पक्षातर्फे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढली जात आहे.नगरपालिकेच्या 12 प्रभागातील एकूण 24 नगरसेवक पदासाठी एकूण 218 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदाचे 21 व नगरसेवक पदाचे 218 असे एकूण 239 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. ए. कापसे काम पाहत असून प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके हे सहकार्य करीत आहेत.

रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन

भाजपतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्यांची आज पाराचा गणपती मंदिरापासून भव्य रली काढण्यात आली. यावेळी आमदार अमोल जावळे, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन, पद्माकर महाजन, राजन लासूरकर, बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, मंदार पाटील, सी एस पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. काँग्रेस तर्फे आयोजित रॅलीत माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.