परवानगी नसतांना रस्त्याचे खोदकाम : ठेकेदाराचा मनमानी कारभार : नागरिकांनी काम पाडले बंद
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग
प्रतिनिधी/ रावेर
येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी संबधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रावेर-अजंदा-निंबोल रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे खोदकाम सुरु केलेले आहे. आधीच अरुंद असल्येल्या या रस्त्याच्या खोदकामामुळे वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे खोदकाम होत असतांना अधिकाऱ्यांना मात्र याचा थांगपत्ता नाही. अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरत हे काम आज बंद पाडले आहे. तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
रावेर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. तापी नदीवरून ऐनपूर येथून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरु आहे. ही पाईपलाईन रावेर-अजंदा-निंबोल रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे खोदकाम करून टाकण्यात येत आहेत. मात्र संबधित ठेकेदाराने बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे खोदकाम सुरु केले आहे. खोदकाम करतांना माती रस्त्यावर टाकल्याने आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरून दोन वाहने जाऊ शकत नाहीत. तर रस्त्यावर माती टाकल्याने संपूर्ण धूळ उडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्या दोन फुटापर्यंत खोदण्यात आल्या असून यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पाईपलाईन टाकल्यावर साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या जात नसल्याची तक्रार निम्बोल्चे निंबोलचे शिवसेनेचे पदाधिकारी राहुल पाटील, सतीश पाटील, अजंदा येथील निलेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली असून रस्त्यावर उतरून हे काम बंद पाडले आहे. रस्त्याच्या कडेला मुरूम टाकून व संपूर्ण रस्ता साफसफाई केल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी मागणी केली.

krushisewak 
