रावेर पंचायत समितीला लागलेला गैरव्यवहाराचा डाग पुसला जाणार का? पारदर्शक व गतिमान कारभाराचा प्रयत्न : नवनियुक्त बिडीओ मेढे यांनी व्यक्त केला विश्वास

कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रथम समज, नंतर कारवाई

रावेर पंचायत समितीला लागलेला गैरव्यवहाराचा डाग पुसला जाणार का? पारदर्शक व गतिमान कारभाराचा प्रयत्न : नवनियुक्त बिडीओ मेढे यांनी व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता यांना प्रथम प्राधान्य देणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी गाव पातळीवरच सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. रावेर पंचायत समितीला पारदर्शक कारभारासह प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न भावी काळात करण्यात येईल असा विश्वास रावेर पंचायत समितीचे नूतन गट विकास अधिकारी व्ही ए मेढे यांनी कृषीसेवक न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केला.

रावेर पंचायत सामीचे बिडीओ म्हणून नाशिक येथून पदोन्नतीवर श्री मेढे यांची बदली झाली आहे. त्यामुळे बिडीओ पदाचा प्रभारी कार्यभार संपुष्टात आला आहे. श्री मेढे यांची भेट घेवून आगामी काळातील त्यांच्या रावेर तालुक्याच्या विकासाच्या संकल्पना, राबविल्या जाणाऱ्या योजना, विविध समाजोपयोगी उपक्रम याबाबत  माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पावसाळा तोंडावर असून पावसाळ्यात अशुद्ध पाण्यामुळे विविध साथीचे आजार उद्भवण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागात टीसीएलयुक्त शुद्ध पाणीपुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री मेढे यांनी यावेळी सांगितले. स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दररोज साफसफाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. दोनतीन दिवसात पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलविण्यात येणार आहे. यात गावनिहाय समस्या समजून घेवून त्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती बिडीओ व्ही. ए. मेढे यांनी दिली. घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला असून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. यासह पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर विशेष भर दिला जाईल असे श्री मेढे यांनी सांगितले. रावेर तालुक्यात २२ आदिवासी गावे असून या भागात आरोग्य सुविधा नागरिकांच्या घरापर्यंत पोहचते की नाही याची सरप्राईज व्हिजीट देवून पाहणी केली जाणार आहे. पंचायत समितीचा कारभारात पारदर्शीपणा आणून अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून तालुक्यात शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर राहणार आहे.    

प्रथम समज, नंतर कारवाई

कामचुकार कर्मचाऱ्यांची दखल आपण घेणार असून अशा कर्मचाऱ्यांना प्रथम समज दिली जाईल. मात्र त्यांनतरही या कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बिडीओ मेढे यांनी यावेळी दिला आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडविल्या जात नसल्याने अशा तक्रारी पंचायत समितीत येतात. त्यामुळे तक्रारदार नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो. यासाठी गाव पातळीवरच या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

लागलेला डाग पुसला जाणार का ?

रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय योजनेतील आर्थिक गैरव्यवहार संपूर्ण राज्यभर गाजला. त्यामुळे तत्कालीन बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात रावेर पंचायत समितीची प्रतिमा पुरती डागाळली गेली. स्थापनेनंतर प्रथमच या कार्यालयाची इभ्रत या घोटाळ्यामुळे चव्हाट्यावर आली होती. पंचायत समितीला लागलेला भ्रष्टाचाराचा हा डाग पुसून काढण्याची जबाबदारी नूतन बिडीओ व्ही ए मेढे यांच्यावर आहे. श्री मेढे यांच्या कार्यपद्धतीने श्रीमती कोतवाल यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला लागलेला डाग पुसला जाणार का? हे भावी काळात दिसणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाच्या योजना प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी श्री मेढे यांच्यावर आहे.