खरीप पूर्वतयारी : महाबीजकडून अडीच लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा : ७१ हजार क्विंटल बियाणे विद्यापीठ संशोधित
अनुदान लाभासाठी अर्ज करावेत

मुंबई : महाबीजची केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका आहे. या खरीप हंगामात महाबीज “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार असून सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.
येत्या खरीप हंगामात महाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टलमधून नोंदणी केलेले असणार आहे. बियाण्याच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेल स्त्रोत, बियाणे कोठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. खरीप २०२५ हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळेत बियाणे पुरवठा करण्याकरिता महाबीजने चोख नियोजन केले आहे. यंदा मान्सुन लवकर येण्याची चिन्हे असल्याची पार्श्वभुमी लक्षात घेऊन बियाणे पुरवठयाचे कार्य सुरू झाले आहे. काही वाणांच्या बियाणेची अतिरिक्त मागणी झाल्यास ते सुद्धा बियाणे उपलब्ध करून देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. महाबीजमार्फत एकूण अडीच लाख क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी ७१००० क्विंटल बियाणे विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधन केलेल्या वाणांचे असणार आहे.
आता अडीच एकरपर्यंत लाभ
पूर्वीची ग्राम बीजोत्पादन योजना आता राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक या नावाने येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी पर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ एकर क्षेत्राच्या मर्यादेतच बियाणे मिळत होते. परंतु यावर्षी ही मर्यादा २.५ एकरपर्यंत वाढविण्यात आली आहे.