रसलपूर ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत आर्थिक गैरव्यवहार : दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

गैरव्यवहारात कोणाचा सहभाग चौकशीत येणार समोर

रसलपूर ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत आर्थिक गैरव्यवहार : दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी/रावेर

तालुक्यातील रसलपूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून सन २०२२ ते २०२५ या काळात झालेल्या कामांची तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. झालेल्या गैरव्यवहारात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात असून चौकशीतून ते समोर येणार आहे.  

१५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना मिळणारा निधी प्रामुख्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटार बांधकाम करण्यासाठी दिला जातो. यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानुसार नियोजन करण्यात येते. ज्यात गावातील गरजांनुसार कामे ठरवली जातात. वृक्षारोपण, शौचालय बांधणे यासह आरोग्य, शिक्षण, उपजीविका वाढवणे यांसारख्या कामांचा त्यात समावेश असतो. मात्र रसलपूर ग्रामपंचायतीने या सर्व विकास कामांना तिलांजली दिली आहे. ग्रामपंचायतीने २०२२ ते २०२५ या काळात १५ व्या वित्त आयोगातून गावात कामे न करताच मोठा निधी खर्ची टाकला आहे. या काळात झालेल्या कामांवर खर्च केलेली रक्कम संशयाच्या भोवऱ्यात आहे. कामे ना करताच रक्कम खर्ची टाकण्यात आली असून याची कसून चौकशी करावी. तसेच यामध्ये दोषीं आढळणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

कागदोपत्री कामे, बोगस बिले

ग्रामपंचायतीने २०२२ ते २०२५ या काळात १५ वा वित्त आयोगातून काही ठिकाणी केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. तर काही कामे न करताच बिले काढण्यात आली आहेत. यात काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या ग्रामपंचायतीच्या वरील काळातील आर्थिक व्यवहाराची जिल्हा परिषेदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात येवून यात दोषी आढळणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे करण्यात आली आहे.