रावेरला वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहीम : अल्पवयीन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई : आज रात्री पोलिसांची वाहनचालकांवर राहणार करडी नजर

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल

रावेरला वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहीम : अल्पवयीन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई : आज रात्री पोलिसांची वाहनचालकांवर राहणार करडी नजर
पोलिसांनी कारवाई केलेली वाहने

प्रतिनिधी / रावेर

रावेर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी वाहनधारकांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. सोमवारी एकूण २७ वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान नव्या वर्षाचे स्वागत करतांना वाहनचालक युवकांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. धुम्रपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी दिला आहे.

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

रावेर शहरात बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांनी कळस गाठला असून याला आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली आहे. शहरातील प्रमुख चौक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीत अडथला निर्माण होतो. तसेच डॉ आंबेडकर चौक ते ग्रामीण रुग्णालय, डॉ आंबेडकर चौक ते डॉ हेडगेवार चौक, उटखेडा फाटा ते डॉ आंबेडकर चौक, व स्वस्तिक टोकीज या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडतात. याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी कडक मोहीम सुरु केली आहे. यात विना नंबरची वाहने, नंबर प्लेट नसलेले वाहन, ट्रिपल सीट वाहने, विनाकारण होर्न वाजवणारे चालक, अल्पवयीन वाहनचालक, लायसन्स नसलेले वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथला होईल असे रत्यावर उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा डॉ जयस्वाल यांनी दिला आहे.      

२७ जणांवर दंडात्मक कारवाई

रावेर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम सोमवार पासून सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात १८ वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले. तर ७ मोटारसायकलीवर ट्रिपल सिट व्यक्ती असल्याचे दिसून आल्याने या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलांसह पालकांवर कारवाई   

मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलेमुली लायसन्स नसताना वाहन चालवतात. यापैकी अनेक वाहन ट्रिपल सीट असतात. अशा सर्व अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. या मुलांसह त्यांच्या पालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. दोन अल्पवयीन मुले वाहन चालवतांना आढळून आल्याने त्यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

युवकांवर आज पोलिसांचे विशेष लक्ष

अपघाताच्या घटना टाळण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बेशीस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे. आज नव्या वर्षाचे स्वागत करतांना धुम्रपान करून वाहन चालविताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.

डॉ विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक, रावेर