रावेरला जुना सावदा रोडवर अतिक्रमण करणारा गावपुढारी कोण ? नगरपालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी ध्रुतराष्ट्रच्या भूमिकेत

रावेर न्यायालयात याचिका दाखल करणार

रावेरला जुना सावदा रोडवर अतिक्रमण करणारा गावपुढारी कोण ? नगरपालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी ध्रुतराष्ट्रच्या भूमिकेत

प्रतिनिधी /रावेर 

येथील जुना सावदा रोडवर अतिक्रमण करून आरसीसी कॉलमद्वारे तब्बल 20 दुकानांचे बांधकाम भरदिवसा राजरोसपणे सुरु आहे. बांधकाम करणारा व्यक्ती गावपुढारी असून ही व्यक्ती मात्र पडद्याआड राहून बांधकाम करीत आहे. अतिक्रमण करणारा हा गावपुढारी कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या या रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करून शॉपिंग कॉम्लेक्स उभारले जात आहे. हा रस्ता नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. असे असतांना नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असून ते सध्या ध्रुतराष्टाच्या भूमिकेत असल्याचे दिसते. या अधिकाऱ्यांनी डोळ्यावरील पट्टी काढावी व सुरु असलेले हे बांधकाम त्वरित काढून टाकावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या अनधिकृतपणे सुरु असलेल्या अतिक्रमित बांधकामची तक्रार जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. तसेच या अनधिकृत अतिक्रमणबाबत दोन दिवसात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. 

रावेर शहरात मोठ्या प्रमाणावर सर्वच ठिकाणी अतिक्रमण सुरु आहे. शहरातील पोलीस स्टेशनच्या कॉर्नरपासून नवीन रेस्ट हाऊसपर्यंत जाणाऱ्या जुना सावदा रस्त्यावर सुमारे 20 दुकानाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स अतिक्रमण करून बांधण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत हा रस्ता आहे. या विभागाचे कार्यालय अतिक्रमण सुरु असलेल्या जागेपासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असतांना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे अर्थपूर्ण हेतूने दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तर हा रस्ता नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. शहरात बांधकाम करताना पालिका प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावशक आहे. मात्र या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून भरदिवसा अतिक्रमण करणारा हे गावपुढारी कोण आहेत ? याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. 

आर्थिक तडजोडीची चर्चा 

संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण होत असून अतिक्रमण करणाऱ्यानी मोठी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा नागरिकांत सुरु आहे. अतिक्रमणाला नगरपालिकेच्या माजी पदाधिकारी व एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा छुपा पाठिंबा आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून नंतर ही दुकाने विक्री करून त्यातून मलिदा लाटण्याचा या गावपुढाऱ्यांचा हेतू आहे. राजकीय पाठबळ व अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून हे अतिक्रमण होत असल्याचे दिसून येते. 

पालिकेची नोटीस कचऱ्याच्या डब्यात 

याबाबत येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्याकडे तक्रार केली असता अतिक्रमण बाबत पालिकेने नोटीस बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतांना अतिक्रमण करणाऱ्या या गावपुढाऱ्यांनी पालिकेच्या नोटीसला कचऱ्याचा डबा दाखवत पालिका प्रशासनाला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवले आहे. 

बांधकाम पडण्याची कार्यवाही होईल : महाजन 

हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ताब्यात असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय जागेवर होणाऱ्या बांधकामबाबत कारवाई केली जाईल. सुरु असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही बांधकाम केल्यास पोलीस संरक्षण मागून बांधकाम काढण्यात येऊन शासकीय जागा मोकळी केली जाईल अशी माहिती या विभागाचे अभियंता पी एल महाजन यांनी दिली.