खबरदारी : रावेरमधील जुना सावदा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद
या रस्त्याचा वापर टाळण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
पंधरा दिवसांत तालुक्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नागझिरी नदीला पूर आल्याने शहरातील जुना सावदा रस्त्यावरील मोरी पुलाची एक बाजू खचली आहे. धोकेदायक स्थिती असलेल्या या पुलावरून सुरु असलेली अवजड वाहनांसह सर्व वाहनांची होणारी वाहतूक प्रशासनाने पूर्णपणे बंद केली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून नगर पालिका प्रशासनाने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
५ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने या रस्त्यावरील पुलावरून घरी जाणाऱ्या येथील माजी नगरसेवकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यूची घटना घडली आहे. पुरामुळे या पुलाचा दक्षिणेकडील भाग खचला आहे. तर १९ जुलैला पुन्हा आलेल्या पुरात पुलाची स्थिती कमकुवत झाली आहे. अतिशय जीर्ण व धोकेदायक स्थितीत असलेला हा पूल केव्हा पडेल याची शाश्वती नाही. या पुलावरून एसटी बस तसेच केळीच्या व इतर अवजड वाहनांची रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. मात्र सध्या पावसाळा सुरू असून या नदीला येणाऱ्या पुरात जिवीत हानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तहसिलदार बंडू कापसे, नगर पालिका मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे व पोलीस निरिक्षक कैलास नागरे यांनी हा रस्ताअवजड अवजड वाहनासह सर्व वाहनाच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.
सध्या पावसाळा असून नदीला येणाऱ्या पुराची स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून धोकेदायक स्थितीत असलेल्या नागझिरी पुलावरून सर्व वाहनांची वाहतूक नवीन पूल उभारणी होईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन या पुलाचा वापर टाळावा.
--- बंडू कापसे, तहसीलदार रावेर
सदरचा पूल कमकुवत झाल्याने या पुलावरून वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्व वाहनांसाठी जुना सावदा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी गावातील पर्यायी रस्त्याचा वापर करावा .
---कैलास नागरे, पोलीस निरीक्षक रावेर
पावसाळ्यात पुलावरुन पाणी वाहत असताना एखादी अनुचीत घटना घडू नये यासाठी पालिकेतर्फे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वालिहा मालगावे मुख्याधिकारी,रावेर