गावपुढाऱ्यांची मुजोरी : अतिक्रमणावर चिटकवलेल्या नोटीसा फाडल्या : रात्रीस चालणार बांधकामाचा खेळ
बांधकाम विभागाचे अधिकारी देणार पोलिसांना पत्र
प्रतिनिधी /रावेर :
रावेर शहरात जुना सावदा रोडवर शासकीय जागेत सुरु असलेल्या 20 दुकानावर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारात अतिक्रमणावर उप विभागीय अभियंता आर पी इंगळे यांनी नोटीस चिटकवल्या होत्या. मात्र मुजोर झालेल्या अतिक्रमण धारक गावपुढाऱ्यांनी व त्यांच्या चेलाचपाट्यानी या नोटीसा फाडून टाकल्या आहेत. अपूर्ण दुकानांचे बांधकाम रात्रीतून उरकण्याची तयारी सुद्धा त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, रात्री येथे अतिक्रमण बांधकाम होऊ नये यासाठी बांधकाम विभागाकडून पोलिसांना पत्र दिले जाणार आहे.
येथील जुना सावदा रोडवर सुरु असलेल्या 20 दुकानांचे बेकायदेशीर आरसीसी अतिक्रमण थांबवण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकामावर बुधवारी नोटीसा चिटकावल्या होत्या. मात्र या नोटीसा रात्री अतिक्रमण करणाऱ्यांनी फाडून टाकल्या आहेत. यावरून गावपुढारी व अतिक्रमण करणाऱ्यांची वाढलेली मुजोरी लक्षात येते. एक प्रकारे ही दहशत माजविण्याचा हा प्रकार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना बांधकाम विभागाने बांधकाम करीत असलेल्या जागेचे मालकी असल्याचे कागदपत्र सादर करण्यासाठी आठ दिवसाची मुदत दिलेली आहे याबाबत ही नोटीस चिटकवण्यात आली होती. मात्र मुजोर झालेल्या अतिक्रमण धारकांनी नोटीस फाडून टाकत शासनाला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. नोटीस लागल्यावर अतिक्रमण धारकांची गुप्त बैठक झाली असून रात्रीतून बांधकाम उरकण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एका अतिक्रमणधारक असलेल्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यात नगरपालिकेचा माजी पदाधिकारी, एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता, एका शिक्षण संस्थेचा कर्मचारी तथा एका संस्थेचा संचालक, एका निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा, एक शासकीय कर्मचारी, एक दूध व्यावसायिक, एक आचारी, एक ठेकेदार व व्यवसायिकासह अन्य व्यक्तींचा बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. सुरु असलेल्या अतिक्रमण बांधकामाला उपविभागीय अभियंता श्री इंगळे यांनी स्थगिती दिली असून अतिक्रमण धारकांना जागेच्या मालकीबाबत कागदपत्र सादर करण्यासाठी आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणात नगरपालिकेतर्फे संयुक्तरित्या मोहीम राबवून सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अभियंता पी एन महाजन यांनी सांगितले. अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कार्यकारी अभियंता श्री पाटील यांना आदेश दिलेले आहेत.
बांधकामाचा रात्रीस चालणार खेळ
अतिक्रमण धारकांची गुप्त बैठक नोटीस चिटकवल्यावर झाली असून यात अपूर्ण बांधकाम रात्रीतून उरकण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती एका अतिक्रमण धारकांने दिली आहे. तर यावर अंकुश ठेवण्यासाठी बांधकाम विभागातर्फे पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.