निवडणूक विश्लेषण : आमदार अमोल जावळे यांचा ग्राउंड लेव्हलवर उतरून नागरिकांशी संवाद, वेळीच डॅमेज कंट्रोल, नाराजांचे मनपरिवर्तन व विकासाबाबत दिलेल्या विश्वासामुळेच भाजपला यश

इतिहासात प्रथमच रावेर पालिका भाजपच्या ताब्यात

निवडणूक विश्लेषण : आमदार अमोल जावळे यांचा ग्राउंड लेव्हलवर उतरून नागरिकांशी संवाद, वेळीच डॅमेज कंट्रोल, नाराजांचे मनपरिवर्तन व विकासाबाबत दिलेल्या विश्वासामुळेच भाजपला यश

कृष्णा पाटील/रावेर

रावेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. यात नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन या १४ हजार एवढ्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. नगर पालिकेच्या इतिहासात पालिकेची निवडणूक प्रथमच भाजपने पक्षीय पातळीवर लढली असून यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले आहे. नगराध्यक्ष संगीता महाजन यांच्या माध्यमातून पालिकेवर भाजपचा झेंडा रोवला गेला आहे. आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या निवडणुकीचे श्री जावळे हेच किंगमेकर ठरले आहेत. निवडणूक काळात आमदार अमोल जावळे यांनी थेट ग्राउंड लेव्हलवर उतरून नागरिकांशी साधलेला सुसंवाद, विविध समाज घटकांच्या घेतलेल्या भेटी व बैठका, सावधगिरी बाळगून वेळीच केलेले डॅमेज कंट्रोल, अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या नाराज इच्छुकांचे केलेले मनपरिवर्तन व मतदारांना शहराच्या विकासाबाबत दिलेला विश्वास आणि हमी यामुळेच पक्ष चिन्हावर भाजपला हे यश मिळालेले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आमदार अमोल जावळे यांच्यावर या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने पुन्हा विश्वास दाखवत सत्तेची सूत्रे भाजपकडे दिली आहेत.

विश्वासात घेत नाराजी दूर करण्यात यश  

रावेर पालिकेच्या नगरसेवक पदाच्या एकूण २४ जागांपैकी ९ जागा भाजपला, १० जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), २ जागा कॉंग्रेस, २ जागा अपक्ष, व १ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला(शरद पवार गट) मिळाली आहे. भाजपकडे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असतांना उमेदवारी देण्याबाबत बराच काथ्याकूट झाला होता. नगराध्यक्ष पदासाठी संगीता महाजन व डॉ योगिता पाटील प्रबळ दावेदार होत्या. मात्र पक्षाने संगीता महाजन यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच नगरसेवक पदासाठी सर्वच प्रभागात तरुण व नवख्यांना संधी दिल्याने इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र आमदार अमोल जावळे यांनी डॉ. संदीप पाटील, डॉ योगिता पाटील यांच्यासह उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांना विश्वासात घेत तात्काळ त्यांची पक्षाविषयी असलेली नाराजी दूर करण्याची किमया केली होती. नाराज इच्छुकांचे मनपरिवर्तन करण्यात आमदार जावळे यशस्वी ठरले होते. डॉ योगिता पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने मराठा समाजात काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र डॉ संदीप पाटील यांच्यासह या समाजातील नागरिकांनी “उमेदवारी मागण्यापर्यंत समाज, मात्र त्यांनतर पक्षाचे काम” ही भूमिका घेवून निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी भाजप विचारधारेच्या मराठा समाजाने निष्ठेने काम केले आहे हे मतमोजणीच्या निकालावरून स्पष्ट होते.

तत्काळ डॅमेज कंट्रोल

वर्षानुवर्षे भाजपचे काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने काही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र या सगळ्यांची नाराजी दूर करण्यात आमदार अमोल जावळे, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सी एस पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी यशस्वी ठरल्याने पक्षाला यश मिळवता आहे. समयसूचकता व सावधगिरी बाळगत श्री जावळे यांनी तात्काळ केलेले डॅमेज कंट्रोल विजयाच्या दृष्टीने लाभदायी ठरले.

ग्राऊंडलेव्हलवर उतरून संघटन

आठ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर श्री जावळे यांच्या कारकिर्दीतील व नेतुत्व करणारी ही पहिलीच निवडणूक होती. मात्र अतिशय संयम ठेवत ग्राउंड लेव्हलवर उतरून त्यांनी विविध समाजातील नागरिकांशी, मतदारांशी सुसंवाद साधला. शहराच्या विविध भागात प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या. व याचवेळी मतदारांना शहराच्या विकासाबाबत आश्वासन न देता विश्वास दिला. शहराच्या विकासाची हमी देखील भेटीत दिली. याचा प्रभाव पडून भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

महाजन परिवाराचे योगदान आले कामी

नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. संगीता महाजन यांचा परिवार अनेक वर्षापासून भाजपशी जुळलेला आहे. सौ. महाजन यांचे जेठ पद्माकर महाजन यांचे पक्षात सक्रीय कार्य असून पक्ष संघटन, पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यात त्यांचा अग्रक्रमाने सहभाग असतो. तसेच संगीता महाजन यांचे पती भास्कर महाजन समाजसेवी कामे करण्यात शहरात अग्रभागी आहेत. क्रीडा, शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रात त्यांचा नेहमी पुढकार असतो. रक्तदान शिबिराचे आयोजन, अपघातात मदत करण्यापासून ते बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत त्यांचे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे महाजन बंधूंचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जनसंपर्क आहे. हा जनसंपर्क त्यांना निवडणुकीत कामी आला.तसेच अंबिका व्यायाम शाळेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या असलेल्या मोठ्या फळीचे यावेळी त्यांना सहकार्य मिळाले. पद्माकर महाजन यांचा मुस्लिम समाजात असलेला संपर्क मुस्लिमांची मते भाजपकडे वळविण्यात यशस्वी ठरला. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची झालेली प्रचार सभा, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी घेतलेल्या कोपरा सभा यामुळे भाजपच्या उमेदवारांना बूस्टर डोस मिळाला. मंत्री श्री महाजन यांनी विकासासाठी निधी देण्याचे दिलेले आश्वासन मतदारांवर प्रभाव पाडणारे ठरले.

कार्यकर्त्यांचे परिश्रम

पक्षाने दिलेले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले. पक्षाचे असलेले संघटन, कार्यकर्त्यांची मोठी फळी, बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या सहकार्याने पक्षाच्या उमेदवारासाठी विजय सोपा झाला. भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचे योग्य नियोजन दिसून आले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा भाजप उमेदवाराने प्रयत्न केला. शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था व समाज मंडळाशी केलेला संपर्क या भाजपसाठी जमेच्या बाजू ठरल्या.

प्रतिस्पर्धी उमेदवारकडे ना नियोजन ना कार्यकर्ते

नगराध्यक्ष पदाच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र पवार या प्रथमच निवडणूक लढत होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट या तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवलेले उमेदवारांची ऐनवेळी माघार घेत मनीषा पवार यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळली. मात्र शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट असेल चार पक्ष एकत्र येऊनही ते भाजपच्या उमेदवाराला तुल्यबळ लढत देऊ शकले नाही. सौ पवार यांच्याकडे प्रचाराचे नियोजन दिसून आले नाही. तसेच चार पक्ष एकत्र असूनही कार्यकर्त्यांची टीम नसल्याने ते मतदारांपर्यंत पोहचू शकले नाही. सौ पवार यांच्या कुटुंबियांचे शिक्षण क्षेत्रपालीकडे सामाजिक कोणतेही काम नाही. चारही पक्ष संघटनाचा व सुसंवादचा अभाव त्यांच्याकडे दिसून आला. शहरातील विविध घटकापर्यंत त्यांचा फारसा जनसंपर्क नसल्याने निकालापूर्वीच त्यांचा पराभव निश्चित समजला जात होता. व तो निकालातून खरा ठरला. सौ पवार दीर्घ आजाराने ग्रस्त असतांना त्यांनी दिलेली लढत मात्र शहरात चर्चेचा विषय ठरली होती.

राष्ट्रवादीची बाजी : काँग्रेसला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदासाठी 15 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे हा पक्ष पालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दारा मोहम्मद यांनी सर्व उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन स्वतः कडे ठेवले होते. तर काँग्रेसने 10 उमेदवार निवडणुकीत उतरवले होते त्यापैकी अवघ्या 2 जागा त्यांना मिळवता आल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 2 जागा लढवून 1 जागा मिळवली आहे.