मराठा समाजातर्फे विवरा येथे रास्ता रोको आंदोलन

जालन्याच्या आंदोलनाला पाठिंबा, सर्वच समाजातील नागरिक रस्त्यावर

मराठा समाजातर्फे विवरा येथे रास्ता रोको आंदोलन

कृषिसेवक न्यूज नेटवर्क/ रावेर

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित विवरा ता रावेर येथील अंकलेश्र्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर विवरा परिसरातील सुमारे पाचशे मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारचा निषेध व आंदोलकांना पाठिंबा दर्शवित विवरा व परिसरातील मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. विवरा येथील सर्वच समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दीड तास आंदोलन सूरु होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दीड दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात यादवराव पाटील, धंनजय चौधरी,पंकज बाबुराव पाटील, गोपाळ दत्तात्रय पाटील ,अमोल पाटील सुनील पाटील, किशोर पाटील यांच्यासह सर्वच समाजातील सुमारे पाचशे नागरिक रस्त्यावर उतरले होते.