सुनेच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसेंची राजकीय खेळी यशस्वी : भाजपवर दबाव निर्माण करण्यात तर स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी( शरद पवार गट)तर्फे एड रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, संतोष चौधरींची नावे आघाडीवर
कृष्णा पाटील/ रावेर
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर करीत या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीतर्फे आपण रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची भावना माजी मंत्री व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अनेकवेळा बोलून दाखवली होती. मात्र सून रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी द्यावी यासाठी चाललेली ही माजी मंत्री खडसे यांची राजकीय खेळी होती. या खेळीत खडसे यशस्वी झाले असले तरी स्वतःच्या उमेदवारीपासून तब्बेतीचें कारण पुढे करीत ऐनवेळी घुमजाव करीत माघार घेतली आहे. सुनेला उमेदवारी मिळावी यासाठी विरोधकांवर स्वतःच्या उमेदवारीचा राजकीय दबाव निर्माण करण्यात खडसे यशस्वी ठरले आहेत. मात्र त्याचवेळी पक्षश्रेठींना स्वतःच्या उमेदवारीचा दिलेला शब्द तब्बेतीचे कारण देत फिरवला आहे. यामुळे स्वपक्षाला कोंडीत पकडण्याचा व भाजपच्या उमेदवार सून रक्षा खडसे यांना विजयाचा मार्ग अधिक सुकर करण्याचा प्रयत्न श्री खडसे यांनी यामाध्यमातून केला आहे. रावेरची जागा राष्ट्रवादीला (शरद पवार गट)सोडण्यात आली असून या जागेसाठी पक्ष आता तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. राष्ट्रवादीतर्फे उमेदवारीसाठी सध्या एड रवींद्र भैय्या पाटील, रावेरचे माजी आमदार अरुण पाटील व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, विनोद सोनवणे यांची नावे आघाडीवर आहेत. यातून एक नाव निश्चित होईल असे मानले जात आहे.
रावेर लोकसभा मतदार संघाचे गेल्या दहा वर्षांपासून रक्षा खडसे संसदेत प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१४ व २०१९ या दोन्ही वेळा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यामुळे त्यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली होती. तसेच या दोन्हीवेळी खडसेंच्या प्रयत्नामुळे त्या विजयीही झाल्या होत्या. त्यावेळी श्री खडसे भाजपमध्ये होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. श्री खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीवासी झालेले आहेत. सुनेची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादीतर्फे रिंगणात न उतरण्याचा खडसे यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीची कोंडी करणारा आहे. जेव्हा कोणी विचारत नव्हते तेव्हा शरद पवार यांनी खडसे यांना साथ दिली असे खडसे यांनी अनेकवेळा जाहीररीत्या सांगितले आहे. मग ऐनवेळी निवडणुकीत माघार घेत खडसे यांनी शरद पवार यांना राजकीय धक्का दिला असेच म्हणावे लागेल.
रक्षा खडसेंपुढे अनेक आव्हाने
तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवारीवर रावेर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी हि निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. अद्याप प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्था व नाराजी याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. त्याच परिणाम म्हणून पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारल्याचे पाहायला मिळाले. अमोल जावळे पक्षाचा आदेश मान्य असल्याचे सांगत असले तरी आता ते व त्यांचे कार्यकर्ते रक्षा खडसे यांचे मनापासून किती काम करतील हा संशोधनाचा भाग आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांचे वैर जगजाहीर आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे रक्षा खडसे यांना विजयासाठी मदत करतात कि नाथाभाऊंचा मागील काळातील हिशोब रक्षा खडसेंच्या माध्यमातून चुकता करतात हे निवडणुकीनंतरच समोर येईल. मुक्ताईनगरात खडसे परिवार व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात कायमच बेबनाव राहिला आहे.मात्र राज्यात भाजप, अजित पवार गट व शिंदे गट यांची महायुती असून आमदार पाटील याचा घटक आहे. २०१९ मध्ये पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरली होती. त्यामुळे मागील व आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. रावेरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव माजी आमदार अरुण पाटील विसरलेले नाहीत. या पराभवाला एकनाथ खडसेंना श्री पाटील जबाबदार धरतात. पराभवाची खदखद त्यांच्या मनात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा हिशोब चुकता करण्यासाठी अरुण पाटील खडसेंच्या सुनेला कितपत मदत करतात हे निवडणुकीत दिसून येणार आहे. रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. गेल्या १५ वर्षांपासून मागणी प्रवाशांची असलेल्या पुणे-दानापूर, सचखंड एक्स्प्रेस, या रेल्वे गाडयांना गेल्या दहा वर्षात खासदार रक्षा खडसे रावेर रेल्वे स्टेशनवर थांबा देऊ शकलेल्या नाहीत. तर महानगरी एक्स्प्रेसच्या थांबा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची नाराजी आहे. प्रवाशांच्या या रोषाला त्यांना याकाळात सामोरे जावे लागणार आहे. मात्र गेल्या दहा वर्षात त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी ठेवलेला जनसंपर्क, जनसामान्यसाठी राबविलेले उपक्रम, केलेली विकासकामे, स्वच्छ प्रतिमा, व पाळलेला संयम या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. सासरे एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातील वादात त्यांनी कधीच कोणाची बाजू घेतली नाही.
एकनाथ खडसेंची भूमिका महत्वाची
एकीकडे सुनेची उमेदवारी तर दुसरीकडे पक्षाची जबाबदारी अशा परिस्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी श्री खडसेंच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. या मतदार संघात खडसे विरुद्ध खडसे अश्या सामन्याला खडसेंनी माघार घेत पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादीतर्फे डमी उमेदवार देऊन सुनेला निवडून आणण्याची राजकीय खेळी पुन्हा खेळू शकतील अशी जनमानसात चर्चा आहे. तर त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांच्या नावाबाबत आता पक्षश्रेठी चाचपणी करीत आहेत. या पक्षातर्फे अद्याप कोणाचेही नाव उमेदवार म्हणून निश्चित झालेले नसले तरी माजी आमदार संतोष चौधरींना पक्षश्रेठीनी शब्द दिल्याचे चौधरींचे समर्थक सांगत आहेत. भुसावळात चौधरींच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोस्तव साजरा केला. तर एड रवींद्र पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांच्याशीही पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बोलणे झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.