उटखेडा ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

उटखेडा ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

प्रतिनिधी/रावेर

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवीत विजयी झालेल्या उटखेडा(ता. रावेर) ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही. त्यामुळे या सदस्यांनी शासकीय नियमांचे पालन केलेले नसल्याने त्यांना अपात्र करावे अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई अटळ आहे.

उटखेडा ग्रामपंचायतीच्या एकूण ९ पैकी आरक्षित असलेल्या ४ जागांवर सदस्य निवडून आलेले आहेत. या जागांवर निवडणुक लढतांना उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निकालानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. मात्र निवडणुकीला आता दोन वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनही या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे अद्याप पर्यंत सादर केलीले नाही.

नियमांचा केला भंग

आरक्षित जागेवर निवडणुकीने विजयी होणाऱ्या उमेदवाराने सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. तसा शासकीय नियम आहे. दरम्यान शासनाने पुन्हा सहा महिने यासाठी मुदतवाढ दिली होती. मात्र आरक्षित जागेवर विजयी झालेल्या या ग्रामपंचायतीच्या चौघा सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र एका वर्षाच्या आत सादर केलेले नाही. त्यापैकी एका सदस्याने पदाचा राजीनामा दिला असून उर्वरित तीन सदस्यांना अपात्र करण्यात यावे अशी तक्रार नजमुद्दीन शेख रा रावेर यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केली आहे. या सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई अटळ आहे.