इशारा : निवडणुकीत पक्षाविरुद्ध काम करणाऱ्यांची योग्य वेळी दखल घेवू : आमदार अमोल जावळे
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेरला भाजपची बैठक
प्रतिनिधी/रावेर
आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र पक्ष एकालाच उमेदवारी देवू शकतो. बाकीच्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. पक्षात अनेक महत्वाच्या पदांवर या इच्छुकांना भविष्यात संधी देण्यात येईल. प्रत्येकाने निष्ठेने पक्षाचे काम करावे असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले. पक्षाविरुद्ध काम करणाऱ्यांची “योग्य वेळी” पक्षाकडून दखल घेतली जाईल असा सूचक इशाराही आमदार श्री जावळे यांनी यावेळी दिला आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे भारतीय जनता पक्षाची तालुकास्तरीय बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल जावळे, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, डॉ संदीप पाटील,पद्माकर महाजन, राजन लासूरकर, शितल पाटील, गोमती बारेला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती, बूथ स्तरावरील संघटन बळकटीकरण, जनसंपर्क अभियान, तसेच प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ शिंदे, जिल्हा उपाध्यक्षा रेखा बोंडे, चिटणीस विजय महाजन, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, अँड. प्रा. सुर्यकांत देशमुख, दुर्गेश पाटील, , राजेंद्र चौधरी, जिल्हा सदस्य नितीन पाटील, उमेश महाजन, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार श्री जावळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीचे प्रास्ताविक अरुण शिंदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार रवींद्र पाटील यांनी मानले.
“येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला निर्विवाद बहुमत मिळणार आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे निवडणुकीत काम करणार असून पक्षाने दिलेला उमेदवार विजयी करणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाचे बारीक लक्ष राहणार आहे. अशा कार्यकर्त्यांची निवडणुकीनंतर पक्षातर्फे योग्य ती दखल घेण्यात येईल.”
------- अमोल जावळे आमदार रावेर

krushisewak 
