बोर घाटातील अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू : आमदार अमोल जावळे यांची तत्परता : जखमीवर तात्काळ उपचार सुरु
वाहन जप्त, चालक फरार

प्रतिनिधी/ रावेर
खिरोदा- पाल रस्त्यावरील बोर घाटात रविवारी रात्री एका थार गाडीने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. थार गाडीने दिलेली धडक इतकी जोरदार होती की या झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह त्याचा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडली. पिंटू बोडोले (वय 30 )व रितिक बोडोले (वय 3) हे बापलेक या घटनेत ठार झाले आहेत. आमदार अमोल जावळे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या अपघातात जखमी झालेल्या मायलेकावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्याच्या व मदत पुरविण्याच्या सूचना केल्या.
पिंटू बोडोले हे त्यांची पत्नी मालुबाई वय 28 आणि रितिक वय 3 व टेंगुराम वय 8 महिने यांच्यासह भुसावळ येथून पाल येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने येत होते. त्याचवेळी खरगोनकडून भुसावळकडे जाणाऱ्या थार गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाला असून मालुबाई व टेंगुराम जखमी झाले आहेत. अपघातांनंतर वाहन चालक फरार झाला असून वाहन सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आमदार जावळे यांची तत्परता आणि मदतकार्य
बोर घाटात झालेल्या अपघाताची माहिती आमदार अमोल जावळे यांना मिळताच त्यांनी त्वरित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व अपघातातील जखमीवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रावेर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून मदतकार्य सुरु केले. रावेर येथील भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील, बाळा आमोदकर, योगेश महाजन, बंटी चौधरी, सागर चौधरी, बापू महाजन यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमीना धीर देत मदतकार्य केले. मयत बापलेकांवर पाल येथे याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून जखमी मालुबाई व टेंगुरामवर फैजपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आमदार अमोल जावळे यांच्या या समयसूचकता व तत्परतेची रावेर तालुक्यात चर्चा होत असून त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.