पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली केंद्रप्रमुखाची दुकानदारी : कारवाईचा धाक दाखवून शिक्षिकेकडून अर्ध्या लाखाची वसुली
"त्या" केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
प्रतिनिधी / रावेर
येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील आर्थिक वसुलीच्या प्रकरणात आणखी नवा अध्याय समोर आला आहे. शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून सक्तीच्या वसुलीचे प्रकार उजेडात आल्यानंतर या विभागातील इतर अधिकाऱ्यांनीही "हात ओले" करून घेण्याचा कित्ता गिरवला आहे. रावेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा "हस्तक" असलेल्या एका केंद्रप्रमुखाने पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली वसुली करीत याला "दुकानदारीचे" स्वरूप दिले आहे. तर कारवाईचा धाक दाखवून एका शिक्षिकेकडून थेट 50 हजार रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्यायग्रस्त शिक्षिकेने या केंद्रप्रमुखाची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
शाळा तपासणीच्या नावाखाली व शालेय पोषण आहाराबाबत कारवाईचा धाक दाखवून येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून सक्तीची वसुली करण्याचा प्रकार त्रस्त झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांनी उजेडात आणला. दरम्यान या विभागातील काही अधिकाऱ्यांनी व केंद्रप्रमुखाने शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून वसुलीचा "कित्ता" गिरवला आहे. सेवा पुस्तक पडताळणीच्या नावाखाली रक्कम गोळा करणाऱ्या केंद्रप्रमुखाने पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येकी 3900 रुपये प्रमाणे 29 पदवीधर शिक्षकांकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा "मलिदा" जमा केला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर तालुक्यातील एका शिक्षिकेकडून याच केंद्रप्रमुखाने कारवाईचा धाक दाखवत व कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोडीअंती या शिक्षिकेकडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 50 हजार रुपयाच्या रक्कमेची वसुली केल्याचा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याची माहिती कोणाला दिल्यास कारवाईचा धाक दाखवण्याचा गटशिक्षणाधिकाऱ्यांचा हस्तक असलेल्या केंद्रप्रमुखाने दम दिल्याचा प्रकार घडलेला आहे. याशिवाय आणखी वसुलीच्या काळ्या कारनाम्याची अनेक प्रकरणे या केंद्रप्रमुखाची येत्या काही दिवसात उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अन्यायग्रस्त शिक्षिकेची तक्रार
कारवाईचा धाक दाखवून व कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती 50 हजार रुपये घेणाऱ्या केंद्रप्रमुखाविरुद्ध सदर अन्यायग्रस्त शिक्षिकेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच कारवाईचा धाक दाखवत अर्ध्या लाखाची रक्कम उकळणाऱ्या या केंद्रप्रमुखाविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात लाच व खंडणीचा ही शिक्षिका गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

krushisewak 
