परभणी कृषी विद्यापीठाचा एक दिवस बळीराजासोबत अभिनव उपक्रम : शास्त्रज्ञ व अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन
परभणी (प्रतिनिधी) : शेतीतील तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचावे यासाठी "एक दिवस बळीराजासोबत" हा अभिनव उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राबविला आहे. कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा अभिनव उपक्रम संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात आला. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण १६ टीममधील ४७ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग होता. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ५६३ शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ आणि कै. संभाजीराव पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यातर्फे सेंद्रिय शेती व सेंद्रिय आंबा लागवड यातील संधी व आव्हाने या विषयावर मौजे मुगाव, ता. नायगाव( जि नांदेड) येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ इंद्र मणी, माजी जिल्हा परिषद सदस्य पुनम पवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. बी एम कलालबंडी, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. अरविंद पंडागळे, प्रा. अरुण गुट्टे, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.