रावेर तालुक्यात १९५० शेतकऱ्यांचे ५१ कोटींचे नुकसान : मे महिन्यात झालेल्या वादळी नुकसानीचा अंतिम अहवाल
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा
प्रतिनिधी / रावेर
गेल्या मे महिन्यात रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ४४ गावातील १९५० शेतकऱ्यांचे ११४८ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले होते. या वादळात तालुक्यातील ५१ कोटी ३ लाख २२ हजार २९६ रुपयांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाने जाहीर केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मे महिन्यात तालुक्यात वादळी वाऱ्यासह बिगरमोसमी पाऊस झाला होता. यात कापणीला आलेल्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला होता. या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.
शेतकऱ्यांचे ५१ कोटींचे नुकसान
रावेर तालुक्यातील ४४ गावातील १९५० शेतकऱ्यांचे ५१ कोटींच्यावर नुकसान झाले आहे. तर ११४८ हेक्टरवरील केळीचे क्षेत्र यामुळे बाधित झाले होते. नुकसान झालेल्या ४४ गावांमध्ये सर्वाधिक नुकसान खिरोदा प्र यावल येथील २४४ शेतकरी, कळमोदा -१४०, सावखेडा बुद्रुक- १७१, पुरी-११३ अटवाडे-१२७, रोझोदा-११४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
शासनाला अहवाल पाठवणार
" मे महिन्यात रावेर तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी तो वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे."
---- भाऊसाहेब वाळके, तालुका कृषी अधिकारी, रावेर
" ऐन कापणीला आलेल्या केली बागांचे वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. केळी बागांच्या कापणीतून मिळणारी रक्कम खरीप हंगामासाठी उपयोगी पडणार होती. शासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी."
--- गणेश महाजन, शेतकरी व माजी सरपंच आटवाडा ता रावेर