सीएमव्हीचा प्रादुर्भाव : टिश्यूकल्चर रोपे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची चौकशीची मागणी
जळगाव जिल्ह्यात केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
जळगाव जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील लागवड केलेली केळी रोपे शेतकऱ्यांना उपटून फेकावी लागत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याला जबाबदार कोण ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. केळीच्या रोपांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या रोपांची निर्मिती करण्यापूर्वी सर्व प्रकारच्या तपासण्या व पडताळण्या करूनच त्या रोपांची निर्मिती करतात असा दावा केला जातो. तर मग सर्व प्रकारच्या चाचण्या करून निर्मिती केलेल्या रोपांवर सीएमव्ही रोग येतोच कसा ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. म्हणजेच केळीची रोपे निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ रोप निर्मितीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत.
लॅबची तपासणीची मागणी
राज्यात सर्वाधिक केळीच्या लागवडीखाली क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. दरवर्षी सुमारे ५० हजार हेक्टर पर्यंत केळीची लागवड केली जाते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना टिशूकल्चरच्या नावाखाली रोपांची विक्री करून रोप निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु केली आहे. केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या इंडिकेटिंग लॅबची व त्यामधून निर्माण होणाऱ्या रोपांची शासनाने राष्ट्रीय केली संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाकडून तपासणी करावी अशी मागणी रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूकच
दरवर्षी शेतकरी केळीच्या लागवडीसाठी विविध कंपन्यांनी निर्मिती केलेली केळी रोपे घेतात. यासाठी रोपे तीन महिने आगाऊ पैसे देऊन बुक करतात. मात्र शेतकऱ्यांना कंपन्यांकडून वेळेवर रोपे उपलब्ध करून दिली जात नाहीत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. लागवड केलेल्या रोपांवर सीएमव्ही रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने रोपाच्या खरेदीपासून तर लागवड व व्यवस्थापनावर झालेला खर्च रोपे उपटून फेवावी लागत असल्याने वाया जात आहे.शेतकऱ्यांची टिशूकल्चर कंपन्यांकडून आर्थिक लूट केली जात असून दरवर्षी हा आकडा अनेक कोटींच्या घरात आहे.
तर मग रोग येतोच कसा ?
केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्या व प्रक्रिया करूनच रोपांची निर्मिती करतात असा दावा त्यांच्याकडून केला जातो. कंपन्यांचा हा दावा ग्राह्य धरला तर मग प्रश असा निर्माण होतो कि रोपे निर्माण करतांना सर्व चाचण्या यशस्वी केल्यावर रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव होतोच कसा ? केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या लॅबची व त्यातून निर्मिती केल्या जाणाऱ्या रोपांची राष्ट्रीय केळी केली संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञानी व केंद्रीय कृषी मंत्रालयाने तपासणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी मेटाकुटीला
दरवर्षी लागवड केलेल्या केळी रोपांवर कधी सीएमव्ही तर कधी बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून करपा व चरका यासारख्या रोगांचा सामना केली उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यात वादळ, अतिवृष्टी व गारपीटमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणणारे आहे.
.