इंजिनिअर युवकाने ठेकेदारी सोडून उभी केली पाईप कंपनी : रावेरच्या तिरुपती ऍग्रो प्लास्टचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन

उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर : दिलीप अग्रवाल यांनी व्यक्त केला विश्वास

कृष्णा पाटील / रावेर

शेतकरी व शेतीशी बांधिलकी असणाऱ्या येथील अग्रवाल कुटुंबातील स्थापत्य अभियांत्रिकीची (बी ई सिव्हिल)पदवी असलेल्या दिलीप अग्रवाल यांनी शिक्षणानंतर सुरुवातीला ठेकेदारी व्यवसायाला सुरुवात केली. मात्र कुटुंबाची शेतकऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध व जुळलेली नाळ यामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तिरुपती ऍग्रो प्लास्ट नावाच्या पीव्हीसी पाईप निर्मिती करणाऱ्या उद्योगाची उभारणी केली. गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात उच्च व गुणवत्तापूर्ण पीव्हीसी पाईपचे उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांनी रावेर तालुक्यासह परिसरातील शेती सिंचनाखाली आणीत शेतीला सिंचनाची जोड दिली. शेतकऱ्यांनीही त्यांच्या पाईप उत्पादनावर विश्वास ठेवल्याने आज महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात त्यांचे उत्पादन पोहचले आहे. या उद्योगाला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या उद्योगाच्या वाटचालीचा संचालक दिलीप अग्रवाल यांनी मांडलेला लेखाजोखा...

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यावर पहिले अडत दुकान पुनमचंद अग्रवाल यांनी सुरु केले. त्यामाध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांशी अग्रवाल कुटुंबीयांची जवळीक वाढली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांना अनुभवता आल्या. दिलीप अग्रवाल यांनी बी ई सिव्हिल पदवी घेतल्यावर काही काळ ठेकेदारी केली. मात्र शेतकऱ्यांसाठी काम करावे या विचाराने अखेर पीव्हीसी पाईप निर्मितीचा उद्योग २६ सप्टेंबरला १९९८ ला सुरु केला या उद्योगाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

गुणवत्तेत तडजोड नाही

या उद्योगात घरगुती पाण्याच्या नळाच्या पाईपपासून तर शेती सिंचनासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पीव्हीसी पाईपचे उत्पादन करण्यात येते. आज या उद्योगात मोठी स्पर्धा असून कमी किमतीत पाईप बाजारात उपलब्ध आहेत. मात्र कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्मिती करण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी व ग्राहक या उद्योगाशी जुळले गेले आहेत. या सर्वांची ताकद प्रत्यक्षअप्रत्यक्ष या उद्योगामागे उभी आहे. उत्पादन करताना गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही असे संचालक दिलीप अग्रवाल आवर्जून सांगतात.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेवा

शेतीसाठी पाईप घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन करावयाच्या पाईप लाईनचा अभ्यास करून विना मोबदला मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दाबाने पाणी पाहिजे त्या ठिकाणी पोहचवता येते. तसेच विक्री पश्च्यात सेवा देण्यावर या उद्योगाची बांधिलकी आहे.

विश्वासच्या बळावर वितरकांचे जाळे

उद्योगाने शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे पाईप पुरवल्याने विश्वास निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी शेतकरी धरती पाईपची मागणी करीत असल्याने त्यामुळे वितरकांचे जाळे आपोआपच निर्माण झाले आहे. याचा फायदा व्यवसायात वाढीसाठी होत आहे.

मध्यप्रदेश व छत्तीसगड सरकारला पुरवठा

मध्यप्रदेश राज्य सरकारच्या कृषी अभियांत्रिकी विभाग व फलोत्पादन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कृषी योजनांसाठी अधिकृत पीव्हीसी पाईप पुरवठादार म्हणून मान्यता मिळालेली आहे. तसेच छत्तीसगड सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी अधिकृत पुरवठादार म्हणून काम करीत आहे. उद्योगाचा विपणन विभाग दिलीप अग्रवाल यांचा मुलगा आयुष अग्रवाल सांभाळत आहे.

"शेतकरी व ग्राहकांना दिलेली सेवा, उत्पादनात कायम राखलेली गुणवत्ता यामुळे २५ वर्षाच्या वाटचालीत शेतकरी बांधवांचे समाधान करू शकलो आहे. भावी काळात एचडीपीई पाईप निर्मिती करण्याचा उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न राहील."

दिलीप अग्रवाल, संचालक तिरुपती ऍग्रो प्लास्ट, रावेर