प्रकरण मिटवण्यासाठी रसलपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार खडसेंच्या चरणी लोटांगण : हिवाळी अधिवेशनात चौकशीची मागणी करणारच : आमदार खडसे
सहकार्यासाठी अधिकाऱ्यांचेही दरवाजे बंद
प्रतिनिधी/रावेर
तालुक्यातील रसलपूर येथील ग्रामपंचायतीत झालेल्या संशयित आर्थिक गैरव्यवहाराबाबत हिवाळी अधिवेशनात चौकशीची मागणी करण्यात येणार असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले होते. त्यानंतर या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रविवारी थेट आमदार एकनाथराव खडसे यांच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची खात्री आ. खडसे यांना झालेली असल्याने त्यांनी भेटीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना कोणताही शब्द न देता माघारी पाठविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराला यामुळे पुष्टी मिळाली आहे.
रसलपूर ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत सन २०२२ ते २०२५ या काळात कामे न करताच रक्कमा काढल्या गेल्या आहेत. तर करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून यावर मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईक, व मर्जीतील व्यक्तींना कामे देवून या रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची माहिती माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी घेत हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे सुतोवाच केले होते. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी रविवारी थेट मुक्ताईनगर गाठून आमदार खडसे यांच्या चरणी लोटांगण घातले. मात्र या ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची त्यांना खात्रीलायक माहिती असल्याने भेटीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी कोणताही शब्द न देता माघारी पाठवले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र येथेही त्यांना संबधित अधिकाऱ्यांनी थारा न दिल्याने अखेर त्यांना चौकशीच्या फेऱ्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या पदाधिकाऱ्यांना सहकार्याचे दरवाजे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बंद केले आहेत.

krushisewak 
