निवडणूक आखाडा : कोण होईल रावेर मतदार संघाचा कारभारी ; रावेरला चौरंगी लढतीची शक्यता : आजीमाजी आमदार पुत्रांमध्ये रंगणार सामना

बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता

निवडणूक आखाडा : कोण होईल रावेर मतदार संघाचा कारभारी ; रावेरला चौरंगी लढतीची शक्यता : आजीमाजी आमदार पुत्रांमध्ये रंगणार सामना

कृष्णा पाटील / रावेर 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी होणारी निवडणूक आजीमाजी आमदारांच्या पुत्रांचे राजकीय भवितव्य ठरवणारी आहे. या दोन्ही आजीमाजी आमदार पुत्रांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या कार्याची व जनतेच्या सेवेची पुण्याई किती कामी येते हे या निवडणुकीतून दिसणार आहे. काँग्रेस, भाजप, परिवर्तन महाशक्ती व अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून या मतदार संघात चौरंगी लढतीची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. राजकीय वारसदार ठरणाऱ्या कोणत्या उमेदवाराला सहानुभूती मिळते व कोणाला मतदारांच्या नाराजीचा फटका बसतो हे निवडणूक निकालानंतर दिसून येईल.

रावेर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील महाराष्ट्रातील मतदार संघ आहे. सध्या या मतदार संघांचे शिरीष चौधरी हे आमदार असून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिरीष चौधरी यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. तर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत जावळे यांनी चौधरी यांचा पराभव करीत विजयी झाले होते. 2009 मध्ये शिरीष चौधरी आमदार म्हणून निवडून आले होते. विद्यमान आमदाराला पुन्हा सलग दुसऱ्यांदा संधी या मतदार संघातील चाणक्ष मतदारांनी दिलेली नाही. यावेळी विद्यमान आमदार प्रत्यक्ष निवडणुकीत नसून पुत्राला उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुत्राला जनता स्वीकारते की विद्यमान आमदाराला सलग दुसऱ्यांदा संधी देण्याची प्रथा कायम ठेवते हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. आजीमाजी आमदार पुत्रांच्या माध्यमातून राजकीय वारसदार म्हणून मतदार कोणाची निवड करतात हे 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे. 

आजीमाजी आमदारांचे वारसदार आमनेसामने

गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत या मतदार संघातून हरिभाऊ जावळे(भाजप ) व शिरीष चौधरी(काँग्रेस ) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून लढत दिलेली आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या हरिभाऊ जावळे यांचे कोरोना काळात निधन झाले. तर आमदार शिरीष चौधरी यांनी तब्बेतीच्या कारणामुळे राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय 23 मे 2024 रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाहीर केला. याच कार्यक्रमात राजकीय वारसदार म्हणून पुत्र धनंजय चौधरी यांच्यावर आशीर्वाद ठेवावा असे आवाहन उपस्थितांना केले होते. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही आजीमाजी आमदारांचे वारसदार पुत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माजी आमदार स्व जावळे यांचे पुत्र अमोल जावळे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ते रावेर मतदार संघातून इच्छुक होते. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम सुरूच ठेवले. त्याचे फळ म्हणून त्यांना विधानसभेची महायुतीच्या भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी हे काँग्रेसच्या एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस आहेत. स्व जावळे व श्री चौधरी यांनी या मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या शिदोरीचा त्यांच्या पुत्रांना कितपत लाभ होतो हे निवडणुकीतून दिसणार आहे. तसेच पित्यांच्या पुण्याईची कोणाला सहानुभूती मिळते व कोणाला फटका बसतो हे सुद्धा निकालातून दिसणार आहे.  

चौरंगी लढतीची शक्यता 

महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे धनंजय चौधरी, महायुतीतर्फे भाजपचे अमोल जावळे, परिवर्तन महाशक्तीतर्फे अनिल चौधरी, वंचित आघाडीतर्फे शमीभा पाटील व अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे प्रमुख उमेदवार रिंगणात असण्याची अधिक शक्यता आहे. मात्र माघारीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल. दोन्ही आजी माजी आमदारांच्या पुत्रांमध्ये खरी लढत होण्याची शक्यता असली तरी परिवर्तन महाशक्ती प्रहार पक्षाचे अनिल चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दारा मोहम्मद व बहुजन वंचित आघाडीच्या शमीभा पाटील यांना मिळणारी मते निकालावर परिणाम करणारी ठरतील. गेल्या पाच वर्षात रावेर मतदार संघात झालेल्या निवडणुकांचा व घडलेल्या राजकीय घटनांचा या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही व्यक्ती जुने राजकीय हिशोब या निवडणुकीच्या माध्यमातून चुकते करण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच मतदार संघांचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. 

*राजकीय आखाडा * पुढील भागात वाचा...

* विकास कामांबाबत मतदारांचा सूर काय सांगतो...उमेदवाराबाबत जनतेचे काय आहेत बोल... कोण होईल रावेर मतदार संघाचा कारभारी...* कोणामुळे लागेल बंडखोरीचे ग्रहण... याचे सविस्तर विश्लेषण वाचा krushisewak.com या वेब न्यूज पोर्टलवर...