वरिष्ठाच्या आदेशाशिवाय काँग्रेसच्या बैठकांना जाऊ नये : शिवसेना उबाठा गटाची भूमिका
रावेर तालुका प्रमुखांच्या सोशल मीडियावर सूचना
प्रतिनिधी / रावेर
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) व काँग्रेसची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठाचा आदेश येईपर्यंत काँग्रेसने आयोजित केलेल्या कोणत्याही बैठकांना शिवसेना (उबाठा गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाऊ नये अशा सूचना शिवसेना उबाठागट तालुका प्रमुख अविनाश पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिल्या आहेत. हा मेसेज अनेक ग्रुपवर व्हायरल झाला करण्यात आला आहे. रावेर विधानसभा मतदार संघाची जागा ही महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला सुटणार असून या मतदार संघांचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी हे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवर जागा वाटपात एकमत होत नसल्याने स्थानिक पातळीवर घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.