हि तर जितेंद्र आव्हाडांची नौटंकी : मंत्री अनिल पाटील
मयताच्या कुटुंबियांना सोमवारी मिळणार आर्थिक मदत
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
पुरात वाहून गेल्याने मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना सोमवार संध्यकाळपर्यंत शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी रावेर येथील भेटीत पत्रकारांशी बोलताना दिली. तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटात गेलेल्या सर्वाना परत येण्याच्या केलेल्या आवाहनबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी खरे भावनिक आव्हान केले आहे कि हि त्यांची नौटंकी आहे असे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले.
बुधवारी पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री पाटील रावेरात आले होते. त्यांनी मयत सुधीर पाटील व इकबाल शेख कुरेशी यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, रवींद्र पाटील, राजेश वानखेडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार गट दौऱ्यापासून लांब
मंत्री पाटील यांचा पहिलाच रावेर तालुका दौरा होता. मात्र या दौऱ्यात तालुक्यातील दोन तीन पदाधिकारी वगळता शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी लांबच राहिले. पत्रकार परिषदेत माजी जि प सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन उपस्थित होते. तर माजी आमदार अरुण पाटील यांच्याशी फोनवरून बोलणे झाले असून ते आमच्यासोबत असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांची बाजार समितीला भेट
मंत्री पाटील यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी बाजार समितीतर्फे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी,सचिव गोपाळ महाजन उपस्थित होते.