माजी आमदार अरुण पाटील यांना भाजपमध्ये दुय्यम स्थान : कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता

माजी आमदार अरुण पाटील यांना भाजपमध्ये दुय्यम स्थान : कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

प्रतिनिधी/रावेर

रावेर तालुक्याचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता जाऊन तिथे भाजपला सभापती पद मिळाले. आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुका महिनाभरात होणार आहे. तर त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार अरुण पाटील यांना मात्र स्थानिक पक्षपातळीवर सातत्याने दुय्यम स्थान दिले जात असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनावरून दिसून येते. त्यामुळे श्री पाटील यांच्या समर्थक व हितचिंतकांमध्ये पक्षाबद्दल नाराजी पसरली आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष व आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना बोलवविण्यात आले नव्हते. तसेच कार्यकर्त्यांनी दिवाळीनिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवर श्री पाटील यांना स्थान देण्यात आले नव्हते. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरही त्यांचा फोटो टाकण्यात आला नव्हता. तसेच आज प्रसारित करण्यात आलेल्या तीर्थ क्षेत्र विकासासाठी 50 लाख या बॅनरवरही माजी आमदार अरुण पाटील यांना स्थान देण्यात आलेले नाही.

पक्षाच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांतर्फे वारंवार होणाऱ्या या घटनामुळे माजी आमदार अरुण पाटील यांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. रावेर तालुक्यातील मराठा समाजावर श्री पाटील यांची पकड असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र पक्षातर्फे दुय्यम स्थान मिळत असल्याने त्याचा येणाऱ्या निवडणुकांवर निश्चित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माजी आमदार अरुण पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल दाखवत होता.

मला माहिती नाही : रवींद्र पाटील 

वारंवार घडणाऱ्या घटनावरून माजी आमदारांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याबाबत भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. मला माहिती नाही, मी बॅनर पाहिले नाही असे उत्तर त्यांनी दिले.मात्र याच बॅनरवर अध्यक्ष रवींद्र पाटील यांचा फोटो आहे.