स्वतः पदरमोड करीत मोरगाव शाळेला दिले दोन शिक्षक

शिक्षकांना उद्योजक आर एस पाटील देणार १० हजार मानधन

स्वतः पदरमोड करीत मोरगाव शाळेला दिले दोन शिक्षक

प्रतिनिधी / रावेर 

तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील दोन शिक्षकांच्या ९ महिन्यापूर्वी बदल्या झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या ठिकाणी शिक्षण विभागाने दुसरे शिक्षक दिले नाही. त्यामुळे विद्यर्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मोरगाव येथील रहिवासी व इंदोर येथील उद्योगपती आर एस पाटील यांनी स्वतः पदरमोड करीत गावातील होतकरू दोन शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. या नियुक्त शिक्षकांचे दरमहा मानधन पाटील स्वतः देणार आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

मोरगाव खुर्द येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंत मराठी शाळा आहे. नियमानुसार येथे चार शिक्षकांची पदे आहेत. त्यापैकी दोन शिक्षकांची बदली ऑक्टोबरमध्ये झाल्याने तेव्हापासून हि दोन्ही पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावचे प्रभारी सरपंच जे आर पाटील यांनी रिक्त पदांवर शिक्षक मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया यांचीही यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा मंडळी. मात्र जिल्हा परिषदेने व शिक्षण विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतून दाखले काढून दुसऱ्या शाळेत टाकण्याची प्रक्रिया सुरु केली होती. अखेर सरपंच पाटील यांनी हा विषय मोरगाव येथील रहिवासी व उद्योजक आर एस पाटील यांना सांगितला. यातून मार्ग काढत उद्योजक पाटील यांनी गावातील उच्चशिक्षित होतकरू युवतींना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्तिका जगन्नाथ महाजन व सरला सुपडू घोलाने या युवतींना या शाळेत शिक्षक म्हणून तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. या दोघींना उद्योजक पाटील दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन देणार आहेत. पाटील यांच्या या निर्णयामुळे दोन युवतींना रोजगार उपलब्ध झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. पाटील यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. 

गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच गावाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून गावकऱ्यांना विश्वासात घेऊन शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेतर्फे अधिकृत शिक्षक नियुक्त होईपर्यंत या नेमलेल्या युवती शिक्षिका काम करतील. 

-----आर एस पाटील उद्योजक तथा रहिवासी मोरगाव खुर्द