रावेरमध्ये हनीट्रॅप प्रकरणी महिलेसह मुलाला अटक : पाच दिवसाची पोलीस कोठडी : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी
शेवटच्या कडीपर्यंत होणार तपास

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व धनाड्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेचे रावेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर बिंग फुटले आहे. संबंधित व्यक्तीसोबत काढलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या या महिलेला बुधवारी पोलिसांनी एक लाख रुपयाची रक्कम घेताना रंगेहात पकडले होते. तिच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर याप्रकरणी महिलेचा मुलगा निर्मल पाटील वय 21 याला आज अटक केली. या दोघांना न्यायालयाने पाच दिवस 24 मार्चपर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत याचा तपास पोलीस विभागाने सुरु केल्यानंतर सदर महिलेच्या मुलाचा यात सहभाग दिसून आल्याने तो या प्रकरणातील दुसरा आरोपी ठरला आहे. दरम्यान, फसवणूक झालेली प्रतिष्ठित व्यक्ती कोण याची कालपासून रावेर तालुक्यात चर्चा सुरु आहे.
रावेर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्ती जळगावला जात असतांना त्याला लोणी ता चोपडा येथील महिलेने लिफ्ट मागितली. त्यानंतर त्याच्याशी मैत्री करीत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच या महिलेने सदर व्यक्तीला तिच्या घरी जेवणासाठी बोलवले. त्यावेळी गुंगीचे औषध देऊन त्याच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देऊन या महिलेने 2/11/2018 ते 19/3/2025 या काळात आतापर्यंत 11 लाख रुपये घेतले आहे. 19 मार्चला पुन्हा पैशाची मागणी केली. त्यामुळे अखेर "त्या" महिलेच्या "या" प्रकाराला त्रस्त झाल्याने सदर व्यक्तीने पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना आपबीती सांगितली. यावरून पोलिसांनी सापळा लावून बुधवारी दुपारी सदर महिलेला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. महिलेविरुद्ध फसवल्या गेलेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरु करताच या प्रकरणाची दुसरी कडी तिच्या मुलापर्यंत पोहचली. आज पोलिसांनी आरोपी महिलेचा मुलगा निर्मल पाटील याला अटक केली आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव पुढील तपास करीत आहेत. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी व्यक्तीच्या नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. मात्र फसवली गेलेली व्यक्ती कोण? याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला उधाण आले आहे.
आरोपी मायलेकांना पाच दिवस पोलीस कस्टडी
याप्रकरणी महिला व तिच्या मुलाला अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयापुढे उभे केले असता 24 मार्च पर्यंत पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
धागेदोरे कुठपर्यंत?
रावेर तालुक्यात घडलेला हा हनी ट्रॅपचा प्रकार असून यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत. आणखी किती जणांवर हा प्रयोग करण्यात सदर महिला यशस्वी झाली, याच पद्धतीने किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास पोलीस यंत्रणा करणार आहे.
या गुन्ह्याचा कसून तपास सुरु असून सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात आणखी कोणकोण आहेत त्यांचे चेहरे तपासातून समोर येतील. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारची कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
डॉ विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक रावेर