दुर्घटनेतील मेंढपाळांना दिलासा आणी आधार : आमदार अमोल जावळे यांनी पाड्यावर जाऊन मेंढपाळ कुटुंबियांचे केले सांत्वन

तहसीलदारांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या जावळे यांची सूचना

दुर्घटनेतील मेंढपाळांना दिलासा आणी आधार : आमदार अमोल जावळे यांनी पाड्यावर जाऊन मेंढपाळ कुटुंबियांचे केले सांत्वन

प्रतिनिधी / रावेर 

तालुक्यातील मुंजलवाडी जवळ असलेल्या चुनाबर्डी शिवारात विजेच्या कडकडाटासह झालेल्या मूसळधार पावसात वीज अंगावर कोसळल्याने दादा कोळपे (वय २०, रा.लालमती चुनाबर्डी पाड्या) या तरुण मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे.तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती. आमदार अमोल जावळे यांनी आज थेट घटनास्थळी पाड्यावर जाऊन दुर्घटनेत मयत झालेल्या दादा कोळपे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मेंढपाळ कुटुंबियांना दिलासा देत जखमींवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणारा खर्च देण्याचा शब्द देत या कुटुंबियांना आधारही दिला आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमधून सदर कुटुंबाला आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना तहसीलदार बी ए कापसे यांनी दिल्या आहेत. 

दादा कोळपे हे आपल्या कुटुंबासह पाड्यावर थांबले होते. अचानक वीज पडल्याने ते जागेवरच कोसळले. या घटनेत दादाराव सोना कोळपे, चांगदेव सोना कोळपे, सुपडू सोना कोळपे, मोहन काशिनाथ कोरडाकर हे चार जण जखमी झाले आहेत. तर पांच मेंढ्या दगावल्या आहेत. या घटनेने कोळपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबियांची तातडीने तहसीलदार बी ए कापसे यांनी भेट घेवून परिस्थिती समजून घेतली. आज आमदार अमोल जावळे यांनी पाड्यावर जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच इतर जखमी लोकांना स्वखर्चाने रावेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्याचे सांगितले. यावेळी उद्देश कचरे, बाळा आमोदकर, गिरीश पाटील, अतुल महाजन, आकाश पाटील, विशाल कचरे, समाधान महाजन, कुणाल महाजन उपस्थित होते.