गावपुढाऱ्यांचा अतिक्रमणाद्वारे दीड कोटींचा मलिदा लाटण्याचा डाव उधळला : अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता
चार ते पाच जण मिळून करीत होते अतिक्रमण
प्रतिनिधी /रावेर
येथील जुना सावदा रोडवर अतिक्रमण करून आरसीसी कॉलमद्वारे तब्बल 20 दुकानांचे बांधकाम भरदिवसा राजरोसपणे सुरु आहे. बांधकाम करणारा व्यक्ती गावपुढारी असून ही व्यक्ती मात्र पडद्याआड राहून साथीदारांच्या माध्यमातून बांधकाम करीत आहे. याबाबत कृषिसेवक न्यूज पोर्टलने रविवारी वृत्त प्रकाशित करीत या प्रकाराला वाचा फोडली. त्यानंतर बांधकाम करणाऱ्या गावपुढारी व त्याच्या साथीदारांमध्ये कालपासून कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काल सुरु असलेले बांधकाम आज सोमवारी तातडीने बंद करण्यात आले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून 20 दुकानाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्याची विक्री करीत सुमारे दीड कोटी रुपयांचा मलिदा लाटण्याचा डाव या वृत्तामुळे उधळला गेला आहे.
रावेर शहरातील जुना सावदा रस्त्यावर शासकीय जागेत सुमारे 20 दुकानाचे बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स अतिक्रमण करून बांधण्यात येत आहे. याबाबत नगरपालिका, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, व नाशिकच्या आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या अतिक्रमणाबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पत्र देऊन कारवाई करण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने या विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. दरम्यान रविवारी अतिक्रमण करून उभारल्या जाणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर बांधकाम करणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. चार ते पाच जण शासकीय जागेवर हे अतिक्रमण करून तेथे 20 दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारत असल्याची माहिती मिळाली आहे. यात माजी पदाधिकाऱ्यांसह, एका नेत्याचा कार्यकर्ता व एका ठेकेदाराचाही समावेश असल्याची चर्चा आज दिवसभर नागरिकांमध्ये सुरु होती.
मलिदा लाटण्याचे मनसुबे उधळले
कृषिसेवक न्यूज पोर्टलवर आलेल्या वृत्तामुळे शासकीय जागेवर 20 दुकानांचे पक्के बांधकाम करणाऱ्या गावपुढाऱ्यासह कार्यकर्ता म्हणून मिरवून घेणाऱ्याची चांगलीच पंचाईत झाली आहे. तर राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या एका कार्यकर्ता तथा ठेकेदाराने या प्रकाराबाबत आज वेट अँड वाचची भूमिका घेतली आहे. 20 दुकानाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची बेकायदेशीरपणे उभारणी करून बांधकामानंतर एक दुकान 6 ते 8 लाख रुपयात विक्री करण्यात येणार होते. या विक्रीतून सुमारे दीड कोटींचा मलिदा लाटण्याचा गावपुढाऱ्यासह राजकीय कार्यकर्त्याचा व ठेकेदाराचा मनसुबा होता. मात्र याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्याने दिवसा कोटींची स्वप्ने पाहणाऱ्यांचा पुरता डाव उधळला गेला आहे. तर दुकानाच्या विक्रीसाठी बोलणी केलेल्या व्यक्तींनी दुकान घेण्यास नकार कळविला असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.