विशेष : कुसूंब्यात आदिशक्तीचा जागर : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचा यात्रोत्सव

यात्रोत्सवाला सुमारे १०० वर्षांची परंपरा

विशेष : कुसूंब्यात आदिशक्तीचा जागर : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचा यात्रोत्सव
विशेष : कुसूंब्यात आदिशक्तीचा जागर : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचा यात्रोत्सव
विशेष : कुसूंब्यात आदिशक्तीचा जागर : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचा यात्रोत्सव

कृष्णा पाटील/रावेर

रावेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान तालुक्याचे कुलदैवत असलेल्या कुसूंबा येथील भवानी मातेचा यात्रोत्सव म्हणजे एक प्रकारे केवळ रावेर तालुक्यातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर खरगोण येथील भाविकांकडून होणारा हा आदिशक्ती भवानीचा जागरच म्हणावा लागेल.

रावेर पासून सात किलोमीटर अंतरावरील कुसुंबे गावाजवळ सातपुड्याच्या पायथ्याशी वाघ्रेश्वरी भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. कुसुंबे गावापासून पश्चिमेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पहिल्या रांगेच्या पायथ्याशी हे मंदिर या परिसरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी असलेली भवानी मातेची मूर्ती पुरातन काळात स्वयंभु प्रगट झालेली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मूर्तीच्या चरणाशी मंदिराच्या पायथ्याशी गुप्तगंगा तीर्थरूपाने प्रकट झालेली आहे. ले आहे. या तीर्थाचा वापर भाविक प्राशन करण्यासाठी तसेच अंघोळीसाठी वापरतात. यामुळे अनेक व्याधी आजारही बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

यात्रोत्सवाला सुमारे १०० वर्षांची परंपरा

पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेच्या या यात्रोत्सवाला सुमारे १०० वर्षापूर्वीपासून परंपरा आहे. यात्रोत्सव नेमका कोणी कधीपासून सुरु केला याची माहिती मात्र उपलब्ध नाही. मात्र वर्षानुवर्षांपासून स्थानिक नागरिक भाविकांनी यात्रोत्सवाची परंपरा कायम जोपासली आहे.

वर्षभरात २ हजार नवस पूर्ण

कुसूंबा येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवासाठी राज्यभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे येत असतात. बहुसंख्य भाविक नवस बोलतात. ज्यांचे नवस भवानी मातेच्या कृपेने पूर्ण होतात ते नवस फेडतात. वर्षभरात येथे सुमारे २००० नवस फेडले जातात असे मंदिराचे पुजारी विजयदास महाराज सांगतात. येथे सुमारे २०० वर भंडा-याचा कार्यक्रम पाचशेच्यावर नारळाचे तोरण बांधण्याचे नवस यात्रेच्या काळात दिले जातात. याचप्रमाणे ओटी भरून तसेच वस्तू वस्तूरूपाने ही नवस फेडण्याची परंपरा आहे.

जीर्णोद्वार सुरु

परिसरातील संत श्री एकनाथ दासजी महाराज यांचे या ठिकाणी १९८८ मध्ये आगमन झाले तेव्हापासून या मंदिराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. या मंदिराच्या जीर्णोद्वारचे काम सुरु आहे. २००० ते २००३ या कालावधीत या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार काही अंशी करण्यात आला. पुजारी श्री संतोषदासजी महाराज १९८५ पासून मंदिराची देखभाल पूजाअर्चा करीत असत तर २००० सालापासून विजयदासजी महाराज हे मंदिराची पूजाअर्चा करतात.  याबरोबरच या परिसरात नवनवीन सोई सुविधा भाविकांच्या सहकार्यातून  उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. 

नवसाला पावणारी देवी

कुसुंबे येथील श्री भवानी माता मंदिराची काही वैशिष्ट्ये आहे.  या मंदीरातील आई भवानीची मुर्ती ही स्वयंभु असुन भक्तांच्या नवसाला पावणारी आहे. मुख्य मुर्तीच्या गाभाऱ्याच्या खालील बाजुस पाण्याचा झरा गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो.  भवानी मातेचे परम भक्त श्री एकनाथ दासजी महाराज यांनी २४ वर्ष अग्नी तपश्चर्या करून मुख्य मुर्तीच्या वरील बाजुस गुप्त गोदावरी शोधुन काढली या  पाण्याचा वापर पिण्यासाठी मंदिराचे सुशोभीकरणासाठी केला जातो.

यात्रोत्सवाची सर्वधर्मीयांच्या संदलने सुरुवात

कुसूंबा ता रावेर येथील भवानी मातेचा यात्रोत्सवाच्या (शाकंभरी पौर्णिमेला) पूर्व संध्येला सर्वधर्मीय बांधवांकडून संदल काढण्यात येते. म्हणजेच खऱ्या अर्थाने याच दिवसापासून या यात्रेला प्रारंभ होते असे भाविक मानतात. कुसूंबा गावाच्या चोहोबाजूला कमलीशाह बाबा, खटकनशाह बाबा, मिठूशाह बाबा, रमजानशाह बाबा,  चिनगुनशाहवली बाबा अटनशाह बाबा असे विविध दर्गा आहेत. मुख्य दर्गा कमलीशाह बाबांचा असून येथूनच संदलला सुरुवात होते. सर्वच समाजातील बांधवांकडून या दर्ग्यांची विधिवत पूजा केली जाते.   पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच यात्रोत्सवाच्या पूर्व संध्येला संध्यकाळी कमलीशाह बाबांच्या दर्गावर गलेफ, फुलांची चादर टाकून नैवद्य दाखवला जातो. येथूनच संदलला वाजत गाजत सुरुवात होऊन गावाच्या चोहोबाजूला असलेल्या सर्व दर्ग्यांवर हि संदल पोहचते. सर्वच दर्ग्यांवर गलेफ फुलांची चादर अर्पण करून नैवद्य दाखवला जातो. संदल पुन्हा कमलीशाह बाबांच्या दर्ग्यावर पोहचल्यावर तेथे रात्री समारोप केला जातो.

भैरंबुवा राक्षसाची कथा -

भैरंबुवा नावाचा एक राक्षस होता त्याने देवीस तू माझ्या सोबत लग्र कर अशी देवीस गळ घातली. देवीने नकार दिल्यावर त्याने देवीच्या भक्तांना त्रास द्यायला सुरवात केली, भक्तांच्या संरक्षणासाठी देवीने त्या राक्षसास होकार दिला. अट घातली की उद्याचा सुर्योदय होण्याच्या आधी तु माझ्याशी विवाह कर राक्षस आनंदात आपल्या नगरात गेला संपूर्ण वरातीसह सायंकाळी निघाला रात्रीच तो मंदीरापासुन काही अंतरावर येऊन पोहचला विचार करू लागला सुयोंदय होण्यास अजुन खुप उशीर आहे. म्हणुन थोडी विश्रांती घेऊया खुप वेळ प्रवास झाल्याने त्यांना झोप लागली. सुर्योदय झाला ती संपुर्ण वरात तो राक्षस यांची शीळा (दगड) झाले. आजही मंदीरापासुन सुमारे किमी अंतरावर नगरकाठी या गावी या शीळा (दगड) पहावयास मिळतात.

 दैवशक्तीचा चमत्कार

मंदिर परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने काही चोरटे  आलेत्यांनी देवीच्या मूर्तीचे डोळे काढले होते. मात्र देवीच्या दैवशक्तीने या चोरट्याना आंधळे केले होतेत्यावेळी हे चोरटे आंधळे होऊन याच भागात फिरत होते. यावेळी देवीने मोठी गर्जना केली त्यामुळे परिसरातील गावातून  अनेक नागरिक या ठिकाणी आले. त्यावेळी तेथे घडलेला प्रकार लक्षात आला तर हा सर्व प्रकार पाहून देवीचा देवी चमत्कार पाहून नागरीक चकित झाले तेव्हापासून देवीची परिसरात मोठी ख्याती झाली या ठिकाणी यात्रा उत्सव भरण्यास सुरुवात झाली. या परिसरात जुन्या काळात वाघ अन्य पशुपक्षी यांचा मोठा वावर असायचा. नंतर मनुष्य भक्तांची या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने पशुपक्षी कमी होऊ लागले. असे येथील माहितगार जुन्या काळात दर्शनासाठी जाणारे भाविक सांगतात. भाविक भक्तांचे रक्षण आशीर्वाद देणारी भवानी माता अशी श्रद्धा परिसरातील नागरिकांची आहे