शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीचे भूमिपुत्र आमदार अमोल जावळेंनी घडवले दर्शन : शेतकऱ्यांच्या हितासाठी विधान भवनात जावळेंचा आवाज घुमला
रावेर मतदार संघातील साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफीची मागणी
प्रतिनिधी / रावेर
नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी रावेर मतदार संघातील शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीचे दर्शन आमदार अमोल जावळे यांनी घडविले. महायुतीने सुरु केलेल्या साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिल माफ केले आहे. मात्र योजनेचा रावेर विधानसभा मतदार संघात पाणी पातळी खोल असल्याने साडेसात एचपीपेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप वापरावे लागतात. पर्यायाने या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंप ग्राहकांना वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सोलर पंपांमुळे बंद करण्यात आलेले परंपरागत कृषी पंपांचे वीज कनेक्शन पूर्ववत करावे अशा मागणीचा आमदार अमोल जावळे यांचा विधान भवनात पहिल्याच अधिवेशनात घुमला आहे. शेतकरी हिताच्या मागण्यामुळे माजी आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमोल जावळेंनी शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
विधानसभेत बोलताना आमदार जावळे यांनी सांगितले की, मागील काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी लागू केली आहे. साधारणतः साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्यात आली आहे. मात्र रावेर विधानसभा क्षेत्रात एकूण २९ हजार कृषीपंप असून त्यापैकी सुमारे २२ हजार कृषीपंप साडेसात एचपीच्यावर आहेत. भूजल पातळी खालावल्याने येथील शेतकऱ्यांना उच्च क्षमतेचे कृषी पंप वापरण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रावेर मतदार संघातील शेतकऱ्यांना वीजबिल माफीच्या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच सोलर पंप केवळ साडेसात एचपी क्षमतेपर्यंतच उपलब्ध करून दिले जातात. मात्र, भूजल पातळी २०० फूटांपेक्षा खाली गेल्यामुळे या सोलर पंपांचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी लागू करण्यात यावी. याशिवाय सोलर पंपांमुळे बंद करण्यात आलेले परंपरागत कृषी पंपांचे वीज कनेक्शन पूर्ववत करावे अशी मागणीही आमदार अमोल जावळे यांनी यावेळी विधानसभेत केली.
रावेर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार जावळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विधान भवनात वाचा फोडत सरकारचे लक्ष वेधले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असून, या अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महत्त्वपूर्ण मागणी मांडली आहे.