बाधित क्षेत्र नेमके किती ? : रावेर तालुक्यातील केळीवरील सीएमव्ही बाधित क्षेत्राच्या आकडेवारीत तफावत

कृषी विभाग : ४९०० हेक्टर *पाल कृषी विज्ञान केंद्र : ८००० हेक्टर * जळगाव केली संशोधन केंद्र : बाधित क्षेत्राची आकडेवारीच उपलब्ध नाही

बाधित क्षेत्र नेमके किती ? : रावेर तालुक्यातील केळीवरील सीएमव्ही बाधित क्षेत्राच्या आकडेवारीत तफावत

प्रतिनिधी / रावेर 

रावेर तालुक्यातील केळी लागवडीखालील क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील बागा सीएमव्ही रोगाच्या विळख्यात अडकल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ८००० हेक्टर सिएमव्ही बाधित असल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञानी दिली आहे. तर ४९०० हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा अंदाज तालुका कृषी कार्यालयाने व्यक्त केला आहे. दोन्ही संस्थांमधील आकडेवारीत मोठी तफावत असून यामुळे शेतकरीही चक्रावले आहेत. तर जळगावच्या केळी संशोधन केंद्राकडे याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

रावेर तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची दरवर्षी लागवड केली जाते. मात्र सध्या तालुक्यातील केळी बागा सीएमव्ही रोगाच्या विळख्यात अडकल्या आहेत. रोगग्रस्त केळीची रोपे उपटून फेकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांचे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

निश्चित आकडेवारीच नाही

तालुक्यातील किती हेक्टर वरील बागा सीएमव्हीच्या विळख्यात आहेत याची निश्चित आकडेवारी कृषी विभागाचा डोलारा सांभाळणाऱ्या तालुका कृषी कार्यालयाकडे नाही. ४९०० हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी सांगितले तर तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी ४० टक्के म्हणजेच ८००० हेक्टर क्षेत्रावरील बागा सीएमव्हीच्या विळख्यात अडकल्या आहेत. 

आदेश नसल्याने पंचनामे नाहीत 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळी बागा सीएमव्हीग्रस्त असून शासनाचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश कृषी विभागाला नाही. त्यामुळे तालुक्यातील तीन गावातील बाधित बागांच्या पाहणी व्यतिरिक्त कृषी विभाग फक्त बघ्याची भूमिका पार पाडत आहे.  

कंपन्यांनी सोडले वाऱ्यावर 

टिश्युकल्चर रोपे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रोगमुक्त रोपांच्या नावाखाली शेतकऱ्यांना रोपांची विक्री केली आहे. मात्र याच कंपन्यांच्या रोपांवर अधिक सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसून येत असून आता कंपन्यांनी हात झटकले आहेत. लाखो रुपये खर्चून विकत घेऊन लागवड केलेली रोपे शेतकरी उपटून फेकत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना कंपन्यांनी सहकार्य व मार्गदशन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर मालामाल झालेल्या कंपन्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

" केळीचे सीएमव्हीमुळे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी. तसेच पंजाब मधील बटाटा बियाणे कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने केळी ऊतीसंवर्धित रोपांवर बियाणे कायदा तयार करावा." 

-------अमोल गणेश पाटील, शेतकरी केऱ्हाळा ता रावेर