बैठक : मिरवणुकीत बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई
डीवायएसपी डॉ कुणाल सोनावणेंचा इशारा
प्रतिनिधी / रावेर
आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सवाच्या मिरवणुकीत गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, सर्वानी पावित्र्य जपावे असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी केले. आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते.
आगामी काळात मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम समाजाचे गणेश जयंती, ईद ए मिलाद, श्रीकृष्ण जन्माष्टमी, जैन धर्मियांचा उत्सव व सण साजरे होणार आहेत. सर्वानी शांततेत व आनंदात उत्सव साजरे करून त्यांचे पावित्र्य जपावे असे आवाहन डॉ सोनवणे यांनी यावेळी केले. तसेच मिरवणूक काढताना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत गैरवर्तन व बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे यांनी दिला. यावेळी बैठकीला बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
डीजे चालकांनी नियम पाळावे : नागरे
मिरवणुकीत डीजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेत डीजे चालकांनी मिरवणूक पूर्ण करावी, डीजेसाठी वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत व आरटीओ विभागाकडून तपासणी केलेले असावे. नादुरुस्त वाहन वापरू नये अशा सूचना डीजे चालकांना बैठकीत पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिल्या. मिरवणुकीत विनाकारण व्यत्यय आणणाऱ्या डीजे चालकावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. बैठकीचे नियोजन उप निरीक्षक राजेंद्र करोडपती, व पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील यांनी केले.