गौरव : रावेरचे उप कृषी अधिकारी सचिन गायकवाड यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
कृषी विस्तारासाठी केलेल्या कार्याची दखल
प्रतिनिधी/ रावेर
येथील तालुका कृषी कार्यालयातील उप कृषी अधिकारी सचिन गायकवाड यांनी कृषी विभागाच्या विविध कृषी विस्तार कार्यक्रमात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते उत्कृष्ट कृषी विस्तारक म्हणून प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला आहे.
ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभाग व आत्मा विभागातर्फे रुंद सरी वरंबा (बीबीएफ) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी सन २०२५-२६ मध्ये कृषी विस्तार क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रावेर तालुका कृषी कार्यलयातील उप कृषी अधिकारी श्री गायकवाड यांना जिल्हाधिकारी श्री घुगे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वैभव सूर्यवंशी उपस्थित होते.
कृषी विस्तारात उल्लेखनीय कामगिरी
सचिन गायकवाड हे सध्या पाणी फाउंडेशन, उमेद तसेच कृषी विभाग यांच्यामार्फत सुरू असलेल्या फार्मर कपचे कृषी विभागाचे मेंटर म्हणून काम करत आहेत. त्यांचे कृषी क्षेत्रामध्ये रावेर तालुक्यातील योगदान भरीव असे आहे. त्यांनी मागील वर्षांमध्ये मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन योजना, रेशीम उद्योग, केळी लागवडीच्या आधुनिक पद्धती, बदलत्या हवामानानुसार बदलती पीक पद्धती, उत्पादनातील तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार, कृषी विस्तार A. I., रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उनियन अभियान, पीक स्पर्धा, पीक कापणी प्रयोग, तसेच केळीवरील करपा रोग तसेच पनामा रोग निर्मूलन कार्यशाळा शेतकऱ्यांच्या शेती शाळा सुद्धा प्रभावीपणे राबवल्या. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारासाठी शेतकऱ्यांची तयारी करणे. यासारखे कृषी विस्तारचे कार्य त्यांनी या काळात केले आहे. त्यांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय कृषी श्रीमती हर्षदा देसले व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

krushisewak

