शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे : रेशीम विकास अधिकारी राकेश जोशी यांचे आवाहन
रावेरला रेशीम शेती प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न
प्रतिनिधी / रावेर
विविध पिकांचे उत्पादन घेतांना शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला मिळणाऱ्या अल्प भावाचा सामना करावा लागतो. मात्र रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना हमखास शाश्वत उत्पन्न मिळू शकते. केळीला पर्याय म्हणून रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन जळगाव जिल्हा रेशीम विकास अधिकारी राकेश जोशी यांनी केले.
जळगाव जिल्हा रेशीम कार्यालय व साप्ताहिक कृषिसेवक यांच्यातर्फे येथील अजंदा रोडवरील रा. का. इंटरनॅशनल स्कुलच्या आवारात रेशीम शेती प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक पवन कळमकर, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, माजी विक्रीकर अधिकारी तथा रेशीम उत्पादक शेतकरी आर व्ही पाटील, गोटीवाले ज्वेलर्सचे संचालक विजय गोटीवाले, मंडळ कृषी अधिकारी सचिन गायकवाड, महिला शेतकरी सौ मानसी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री जोशी यांनी तुती लागवडीपासून ते कोष निर्मितीपर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. अळी संगोपन गृह (शेड)उभारणी, व्यवस्थापन यावर त्यांनी माहिती दिली. तर वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक श्री कळमकर यांनी तुती बागेची व कीटक संगोपन करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.
शेतीशाळा या उपक्रमांतर्गत तुतीची लागवड करण्यात येणाऱ्या प्रक्षेत्रावर श्री कळमकर यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रेशीम विकास अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निराकरण केले. कार्यक्रमास तालुका कृषी विभागाचे तंत्र सहाय्यक चंद्रकांत माळी, रा. का. इंटरनॅशनल स्कुलचे संचालक महेंद्र पवार, डॉ मनोहर पाटील (वडगाव), ई जे महाजन, डी एन महाजन, पत्रकार सुनील चौधरी, महेंद्र तायडे( सुदगाव), महेंद्र पाटील(अजंदा), प्रशांत माळी (वाघोड )यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तविक व आभार साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक कृष्णा पाटील यांनी मानले.
लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान
रावेर तालुक्यात प्रथमच रेशीम शेती करणाऱ्या सौ मानसी पवार, विजय गोटीवाले व नचिकेत चिनावलकर या तिघा शेतकऱ्यांचा रेशीम विकास अधिकारी राकेश जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तर रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग राबविल्याबद्दल आर व्ही पाटील(मोरगाव खुर्द) व रमेश पाटील (मोरगाव बुद्रुक) यांचा सत्कार करण्यात आला.

krushisewak 
