भाजपतर्फे रावेरला नगराध्यक्ष पदासाठी 5 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती : उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता

प्रभागातून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक

भाजपतर्फे रावेरला नगराध्यक्ष पदासाठी 5 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती : उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ रावेर

2 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजप पक्षातर्फे आज घेण्यात आल्या. रावेर नगराध्यक्ष पदासाठी 5 इच्छुक महिलांनी मुलाखती दिल्या आहेत. नगराध्यक्ष व प्रभाग निहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी मुंबईतून प्रदेश कार्यालयातून होण्याची शक्यता वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

येथील नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील,माजी आमदार अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, राजेंद्र फडके, सुरेश धनके, व पक्षातर्फे नियुक्त टीमने घेतल्या. नगराध्यक्ष पदासाठी डॉ योगिता संदीप पाटील, नलिनी पद्माकर महाजन, रिया शीतल पाटील, रेखा राजेंद्र चौधरी, व संगीता भास्कर महाजन या पाच महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या. तर प्रभागातून निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी संख्या असल्याचे मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या इच्छुकांच्या गर्दीवरून दिसून आले. मुलाखतींचा अहवाल उद्या मुंबईला प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असूनपक्षातर्फे अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी प्रदेश कार्यालयाकडून होण्याची शक्यता असल्याची माहिती मंत्री संजय सावकारे यांनी दिली. पक्ष स्वबळावर की महायुतीतर्फे लढेल याबाबत विचारले असता हा निर्णय पक्षश्रेठी घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्ष पदासाठी मुलाखत दिलेल्यापैकी पक्ष कोणाला संधी देतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.