BREAKING : आमदार अमोल जावळे यांची रुग्णांच्या वेदनांवर मायेची फुंकर : रावेरला शासकीय डायलिसिस सेंटरचे उद्या लोकार्पण
तापी परिसरातील रुग्णांना दिलासा
प्रतिनिधी/ रावेर
रावेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार अमोल जावळे यांनी तापी परीसरारतील किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या वेदनांवर रुग्णसेवेच्या माध्यमातून मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या रुग्णांना आवशक असलेले डायलिसीस सेंटर सातत्याने पाठपुरावा करून मंजूर केले आहे. या सेंटरचे लोकार्पण उद्या १ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. रावेर येथील तापी परिसरातील पहिले शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होत आहे.
आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करण्यात येत असून, त्यामध्ये रावेर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रावेरसह यावल, फैजपूर, मुक्ताईनगर आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी डायलिसिस उपचारासाठी रुग्णांना जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, प्रवासाचा त्रास आणि आर्थिक भार सहन करावा लागत होता. मात्र आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा त्रास कमी होणार असून, उपचार अधिक सुलभ होणार आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागत असताना, शासनमान्य या केंद्रात रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा फायदा होणार आहे. उद्या होणाऱ्या या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक स्तरावर संबंधित अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही सुविधा रावेरला उपलब्ध होत असून आमदार जावळे यांनी रुग्णांच्या वेदनांवर हळुवरपणे मायेची फुंकर घातली आहे.
रुग्णांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
“ किडनीच्या रुग्णांना वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. तसेच सर्वसामान्य रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नाही. याचा विचार करून रावेरला शासकीय डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे."
---- अमोल जावळे, आमदार रावेर

krushisewak 
