क्षमतेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या डीजेवर कारवाईचा इशारा : मिरवणुका व कार्यक्रमात डीजेवर बंदीचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे जनतेला आवाहन
शांतता समितीतीच्या बैठकीत डीजेवर बंदीबाबत चर्चा

प्रतिनिधी / रावेर
उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या विविध मिरवणुका व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर डीजेचा वापर होत आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा अधिक आवाज ठेवला जात असल्याने नियमांचा भंग होत आहे. अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेचालक व अयोजकांविरुद्ध गुन्हा दखल करून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे.
आगामी काळात येणाऱ्या सणउत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेलेकाही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने ते सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात येणारे सणउत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम नागरिकांनी शांततेत साजरे करावेत. या कार्यक्रमामधून डीजेचा वापर टाळावा, यासाठी सर्वांच्या संमतीने सदस्यांनी निर्णय घ्यावा असे आवाहन शांतता समिती सदस्यांना पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी केले. मात्र यावर या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याबाबत नगरपालिकेला पत्र दिलेले असल्याचे यावेळी डॉ जयस्वाल यांनी सांगितले. बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यासाठी शांतता समिती सदस्य सहकार्य करतील तसेच डीजेवर बंदीचा निर्णय सर्वच समाजांना बंधनकारक असेल असे मत माजी नगरसेवक पद्माकर महाजन यांनी व्यक्त केले. दुपारी बारा व संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्याने डॉ आंबेडकर चौकात गर्दी होते. यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी ज्ञानेश्वर महाजन यांनी केली. या बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हरीश गनवाणी, सी एस पाटील, दिलीप कांबळे, दिलीप पाटील, गयासुद्दिन काझी, शैलेश अग्रवाल, राजेश शिंदे, शरद राजपूत, अरुण शिंदे, बाळू शिरतुरे, ज्ञानेश्वर महाजन, सादिक शेख यांच्यासह शांतता समिती सदस्य उपस्थित होते.