रावेर तालुक्यातील स्वयंघोषित शिक्षक पुढऱ्याची चमकोगिरी : शैक्षणिक कामापेक्षा राजकीय कामात अधिक सक्रिय

सिईओंकडे लेखी तक्रार

रावेर तालुक्यातील स्वयंघोषित शिक्षक पुढऱ्याची चमकोगिरी : शैक्षणिक कामापेक्षा राजकीय कामात अधिक सक्रिय

प्रतिनिधी/रावेर 

रावेर तालुक्यातील शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकारणांनी या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. याची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, तालुक्यातील एका स्वयंघोषित शिक्षक पुढऱ्याची  शिक्षण विभागात सुरु असलेली लुडबुड व विनाकारण कामकाजात होणारा हस्तक्षेप तालुक्यातील शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. हा पुढारी शैक्षणिक कामापेक्षा राजकीय कामात अधिक सक्रिय आहे. याची जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)निलेश पाटील यांनी दखल घेवून सदर पुढारी शिक्षकाला त्याची योग्य जागा दाखवण्याची गरज आहे.

तालुक्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे गेल्या काही दिवसापासून हा विभाग चर्चेत आहे. शाळा तपासणीच्या नावाखाली केली जाणारी सक्तीची वसुली, केंद्रप्रमुखांकडून सेवा पुस्तक पडताळणीच्या नावाखाली होणारी शिक्षकांची आर्थिक लूट व पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली उकळलेली रक्कम, आरटीई अंतर्गत पडताळणी समिती गठीत न करता राबवलेली प्रवेश प्रक्रिया अशा अनेक विषयांवरून शिक्षण विभागाचे धिंडवडे निघाले आहेत. याच्या तक्रारी आमदार अमोल जावळे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे केल्या आहेत. दरम्यान स्वतःला शिक्षक पुढारी म्हणवून घेणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्या एका स्वयंघोषित शिक्षक पुढऱ्याचा शिक्षण विभागातील कामकाजात हस्तक्षेप व लुडबुड वाढली आहे. गटशिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी जवळीक साधत व इतर शिक्षकांवर प्रभाव पाडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या आहे. नुकत्याच तालुक्यातील शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांची प्रक्रिया करण्यात आलेल्या दिवशी हा स्वयंघोषित पुढारी दिवसभर कार्यालयात थांबून स्वतःच्या शाळेवर मर्जीतील शिक्षक/शिक्षिका मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. म्हणजे या शिक्षक/शिक्षिकेला दिवसभर शाळेवर थांबवून दिवसभर आपले राजकीय कामे, पक्षीय संघटन व राजकीय मिटिंगाना उपस्थित राहण्यासाठी पुरेसा वेल मिळेल असा यामागील या शिक्षक पुढाऱ्याचा हेतू असावा. मात्र या शाळेला समायोजन बदल्यांमध्ये शिक्षक देण्यात आला आहे. चमकोगिरी करणाऱ्या या स्वयंघोषित पुढऱ्याच्या शैक्षणिक कामकाजाबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून याची दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.