रावेर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीन पाटील बिनविरोध : व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम पाटील

संस्थेच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार

रावेर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीन पाटील बिनविरोध : व्हाईस चेअरमनपदी  पुरुषोत्तम पाटील

प्रतिनिधी/रावेर 

रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी आज संस्थेच्या कार्यालयात निवडणूक झाली. यात चेअरमन पदासाठी नितीन पाटील यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम पाटील यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने या दोन्ही पदांवर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी आमदार अरुणदादा पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, संचालक डॉ राजेंद्र पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, संस्थेचे माजी अध्यक्ष पी आर पाटील, निलेश चौधरी, नीलकंठ चौधरी, वाय व्ही पाटील, अर्जुन पाटील, सोपान पाटील, तुषार महाजन, वासुदेव पाटील, यशवंत धनके यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले.

यावेळी संचालक यशवंत महाजन, किशोर पाटील, रमेश अण्णाजी पाटील, जिजाबराव चौधरी, सीताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर धनगर, बिसन सपकाळ व मॅनेजर विनोद चौधरी उपस्थित होते.

पदाधीकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा : अरुणदादा पाटील 

निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी सहकार क्षेत्राशिवाय शेतकऱ्याची प्रगती होणार नाही. सहकारी संस्था टिकल्या पाहिजे. सहकार क्षेत्र प्रगत असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल असे सांगितले. खरेदी विक्री संघाने उत्पन्न वाढीसाठी विविध उद्योग उभारले पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी करावे. सहकार क्षेत्रात राजकीय पक्ष बाजूला सारून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

संस्थेच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार : नितीन पाटील 

जेष्ठ नेते तसेच संचालक मंडळाने संस्थेच्या कामकाजची जबाबदारी आमच्यावर सोपवून विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना विश्वासात घेवून संस्थेचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना व उपक्रम राबविले जातील. यासाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन नितीन पाटील यांनी सांगितले.