कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना "माफदा" च्या पदाधिकाऱ्यांचा पडला विसर : जळगाव जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांमध्ये नाराजी
प्रदर्शनाकडे कृषी विक्रेत्यांनी दिले पाठ फिरवण्याचे संकेत
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
जळगाव येथे आजपासून एका कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. मात्र कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या (माफदा) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचा प्रदर्शनाच्या आयोजकांना विसर पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रदर्शनाकडे पाठ फिरवण्याचे संकेत दिले आहेत.
जळगाव येथे आजपासून (दि ३) चार दिवस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आज उदघाटन झाले. कृषी केंद्र चालक कृषी प्रदर्शनाचा एक भाग आहे. असे असताना आयोजकांनी कृषी केंद्र चालकांच्या संघटनेला प्रदर्शनात स्थान दिलेले नाही. राज्यात लागू होणाऱ्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी गुरुवारपासून तीन दिवस राज्यातील ७० हजार कृषी केंद्र चालकांनी बंद पुकारला आहे. कृषी केंद्र चालकांची "माफदा" ही राज्यपातळीवर संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ-पाटील हे जळगाव जिल्ह्यातील असून ते सध्या राज्यातील ७० हजार तर जळगाव जिल्ह्यातील ४ हजार कृषी केंद्र चालकांचे नेतृत्व करीत आहेत. मात्र जळगाव येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना या संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना निमंत्रणचा विसर पडल्याने कृषी विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवण्याचे संकेत दिले आहेत.
आयोजकांकडून निमंत्रण नाही
"जळगावमध्ये होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी आयोजकांकडून आपल्याला निमंत्रण नव्हते. तसेच निमंत्रण पत्रिकाही नसल्यामुळे त्या ठिकाणी गेलो नाही. मात्र शेतकऱ्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत."
--विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, माफदा संघटना, पुणे
"कृषी प्रदर्शन हा कृषी विक्रेत्यांसंबंधीचा उपक्रम असताना कृषी विक्रेत्यांना डावलणे योग्य नाही. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या माफदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून न घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. कृषी प्रदर्शनात आयोजकांनी या संघटनेला सहभागी करून घ्यायला हवे होते."
----सुनील कोंडे , अध्यक्ष, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन, रावेर .