जळगावचे केळी संशोधन केंद्र उरले नावापुरते : सीएमव्हीने बाधित क्षेत्राची आकडेवारीच उपलध नाही

रावेरला आज बैठक : केळी उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

जळगावचे केळी संशोधन केंद्र उरले नावापुरते : सीएमव्हीने बाधित क्षेत्राची आकडेवारीच उपलध नाही

कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर

जळगाव जिल्ह्यात ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी केळीची लागवड केली जाते. केळीवर येणाऱ्या विविध रोगांचा अभ्यास, त्यावर संशोधन व शेतकऱ्याना त्यावर उपाय आणि मार्गदशन करण्यासाठी जळगाव येथे केळी संशोधन केंद्र कार्यरत आहे. मात्र या संशोधन केंद्राची अवस्था असून नसल्यासारखीच आहे. जळगाव जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा सीएमव्हीच्या विळाख्यात अडकल्या आहेत. मात्र या रोगामुळे बाधित क्षेत्राची साधी आकडेवारी केली संशोधन केंद्राकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हे संशोधन केंद्र केवळ नावालाच उरले आहे अशा संतप्त प्रतिक्रिया केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. सीएमव्हीने नुकसान झालेले शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असून यावर चर्चा करण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दुपारी २ वाजता शेतकऱ्यांची बैठक होत आहे.   

जळगाव जिल्ह्याचे अर्थकारण केळीवर अवलंबून आहे. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. मात्र गेल्या चारपाच वर्षांपासून या केळीबागांवर मोठ्या प्रमाणावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे रोगग्रस्त झाले उपटून फेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. याचा मोठा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

केळी संशोधन केंद्राची अनास्था 

जिल्ह्यात हजारो हेक्टरवर केळीची लागवड व उत्पादन घेतले जाते. याचा विचार करून शासनाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत जळगाव येथे कृषी संशोधन केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्राचा कोणताही लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. यामागे या केंद्राच्या अधिकारी व शास्त्रज्ञाची अनास्था कारणीभूत आहे. 

शासनाचे लाखो रुपये पाण्यात 

या केंद्रासाठी दरवर्षी शासन लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांपर्यंत केळीतील नवतंत्रज्ञान व संशोधन पोहचवण्यासाठी प्रयत्न करते. मात्र या केंद्राच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव व ठोस असे एकही काम केलेले नाही. जळगाव येथील संशोधन केंद्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होणारा शासनाचा निधी मात्र पाण्यात गेला आहे. 

दोष नेमका कोणाचा ? 

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यात केळीची रोपे निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या केळी रोपांची निर्मिती करून त्यांची शेतकऱ्यांना विक्री करतात. हि रोपे व्हायरस इंडीकेशन लॅबमधून तयार झालेली असताना मग सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव होतोच कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामागे नेमका दोष कोणाचा हे शोधण्याची गरज आहे. 

आज शेतकऱ्यांची बैठक 

सीएमव्हीमुळे होणारे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान कोण भरून देणार ? याला नेमका दोष कोणाचा ? केळी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांची अनास्था यासह पीक विमा व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज दुपारी दोन वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.     

पाहणी दौरा नावालाच

जळगाव जिल्ह्यात सीएमव्हीने बाधित किती हेक्टर क्षेत्र आहे याची माहिती जळगाव केळी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र निश्चित अशी आकडेवारी केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. जुलै व ऑगस्ट या महिन्यात लागवड केलेल्या केळी बागा बाधित असल्याचे या केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ देशमुख यांनी सांगितले. तर रावेर तालुक्यातील केरहाला व तांदलवाडी या दोनच ठिकाणी त्यांनी दौरा काढून भेटी देऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी घेतलेले रोगग्रस्त झाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.