दखल : रावेरचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर : बेशिस्त वाहतुकीवर पोलिसांनी उगारला दंडुका

६२ जणांविरुद्ध कारवाई :३५ हजार दंड वसूल

दखल : रावेरचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर : बेशिस्त वाहतुकीवर पोलिसांनी उगारला दंडुका

प्रतिनिधी/ रावेर 

रावेर शहरातील बेशिस्त वाहतुकीविरुद्ध पोलिस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल यांनी दंडुका उगारला असून चार दिवसात ६२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५, ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कृषीसेवकने "बेशिस्त वाहतुकीला लगाम कोण लावणार" हि बातमी काही दिवसापूर्वी प्रकाशित केली होती. या बातमीची पोलीस निरीक्षकांनी दखल घेत बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत.  

शहरातील ग्रामीण रुग्णालय ते डॉ आंबेडकर चौक, व  डॉ हेडगेवार चौक ते डॉ आंबेडकर चौक, हा मुख्य वाहतुकीचा व रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्यावर विविध बँका, शासकीय कार्यालये, शाळा व व्यावसायिक दुकाने आहेत. तसेच बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा महामार्ग शहराच्या मध्यातून जातो. या महामार्गावरील उटखेडा फाट्यापासून ते स्वस्तिक टॉकीज पर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी होते. डॉ आबेडकर चौक व परिसरात नेहमीच नागरिकांची व वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल थेट रस्त्यावर उतरले आहेत. 

पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर 

शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल हे स्वतः कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, लायसन्स सोबत नसणे, विनाकारण हॉर्न वाजवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा निर्माण करणे अशा कारणावरून ६ ते ९ एप्रिल दरम्यान ६२ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३५,५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ६ केसेस न्यायालयात पाठविण्यात आल्या आहेत. 

यांनी केली कारवाई 

बेशिस्त वाहतुकीविरुद्ध पोलीस निरीक्षकांनी उघडलेल्या मोहिमेत एपीआय गणेश धुमाळ, पोलीस कर्मचारी अतुल तडवी, संदीप घ्यार, मुकेश सोनवणे, गफ्फार तडवी, चैतन्य पाटील, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, सचिन घुगे यांच्यासह आरसीपी प्लाटूनच्या कर्मचाऱ्यांनी ६२ बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत असून या कारवाईत पोलिसांनी सातत्य ठेवावे अशी मागणी होत आहे. वाहनचालकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले आहे.