अवकाळीचा तडाखा : रावेर तालुक्यात केळीसह मक्याचे 9 कोटींचे नुकसान : प्रशासन पाहणीसाठी शेतीच्या बांधावर

34 गावांमधील 251 शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळीचा तडाखा : रावेर तालुक्यात केळीसह मक्याचे 9 कोटींचे नुकसान : प्रशासन पाहणीसाठी शेतीच्या बांधावर

प्रतिनिधी/रावेर 

रावेर तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गुरुवारी संध्याकाळी जोरदार तडाखा दिला असून शेतकऱ्यांच्या केळी व मका पिकाचे सुमारे 9 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वादळाचा 34 गावांना फटका बसला असून 251 शेतकऱ्यांचे 226 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज सकाळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार दीपा जेधे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी नुकसानीची पाहणी करीत पंचनाम्याला सुरुवात केली.

बुधवारी रावेर तालुक्यातील काही गावात वादळी पावसाने हजेरी लावत केळी बागांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे तालुक्यातील 34 गावांच्या शेती शिवरातील केळी व मका पिकाचे सुमारे 9 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. झाले आहे. 

251 शेतकऱ्यांचे 226 हेक्टरवरील नुकसान 

या वादळी पावसाने नेहेते, कुंभारखेडा, सावखेडा, वाघोदा बुद्रुक, सिंगत, तांदलवाडी, थोरगव्हाण, चुनवाडे, मांगी, खिरोदा प्र यावल, कळमोदे, कोचूर खुर्द, कोचूर बुद्रुक, बोरखेडेसिम, अजनाड, अटवाडे, दोधे,  वाघोदा खुर्द, खिर्डी खुर्द, गोलवाडा, भामलवाडी, बलवाडी, शिंगाडी, गाते, चिनावल, ऐनपूर, निंबोल, विटवे, सांगवे, अजंदे, होळ, नंदूरखेडा, भोर, खानापूर या 34 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे 194 हेक्टरवरील कापणीला आलेल्या केळी बागांचे तर 30 हेक्टरवरील मका पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिली 

यांनी केली पाहणी 

तहसीलदार दीपा जेधे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील आमदार अमोल जावळे यांचे स्वीय सहाय्यक संदीप पाटील, राजन लासुरकर, सूर्यकांत देशमुख, महेंद्र पाटील,जयेश कुयटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

जयेश कुयटेंचे 50 लाखाचे नुकसान 

आटवडा येथील युवा शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयेश कुयटे यांच्या कापणीला असलेल्या निर्यातक्षम केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी त्यांच्या केळी बागेला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी उत्कृष्ट बाग व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण उत्पादनबाबत कुयटेंचे अभिनंदन केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी निसर्गाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करणार : आमदार जावळे 

रावेर विधानसभा मतदार संघात झालेल्या अवकाळी पावसाने केळीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल तात्काळ वरिष्ठाना पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.