राजकारण : उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय उद्यावर... रावेरमधून उमेदवारीची मागणी कायम : ऍड रवींद्र भैय्या पाटील

उमेदवार ऍड रवींद्र पाटील की श्रीराम पाटील ?

राजकारण : उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय उद्यावर... रावेरमधून उमेदवारीची मागणी कायम : ऍड रवींद्र भैय्या पाटील
राजकारण : उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय उद्यावर... रावेरमधून उमेदवारीची मागणी कायम : ऍड रवींद्र भैय्या पाटील

कृषीसेवक न्यूज नेटवर्क

रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात असताना व आज संध्याकाळी पाच वाजेनंतर उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे संकेत मिळाले होते. मात्र या मतदार संघातील उमेदवाराची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भैय्या पाटील यांनी कायम ठेवली आहे. आपली उमेदवारीची मागणी कायम असल्याची माहिती खुद्द संभाव्य उमेदवार ऍड रवींद्र भैय्या पाटील यांनी कृषीसेवकशी बोलताना दिली. त्यामुळे आज रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव पक्षातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. मात्र हे नाव उद्या गुरुवारी संध्याकाळी जाहीर होणार असल्याची माहिती मुंबई येथील सूत्रांनी दिली. 

रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचेकडे आहे. या मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवाराची चाचपणी पंधरा दिवसांपासून पक्षातर्फे सुरू आहे. सुरुवातीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र पक्षातर्फे त्यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नव्हते. त्यानंतर अनेक राजकीय हालचालीही झाल्या. मुक्ताईनगरचे विनोद सोनवणे व त्यानंतर उद्योजक श्रीराम पाटील यांची नावे पुढे आली. मात्र गेल्या आठवड्यात ही दोन्ही नावे पुन्हा मागे पडली. त्यामुळे ऍड रवींद्र भैय्या पाटील यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु तीनचार दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. यासंदर्भात पक्ष श्रेष्ठी व पाटील यांच्यात पुन्हा चर्चा झाली. आज पक्ष श्रेष्ठींनी माजी आमदार संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील व ऍड रवींद्र पाटील यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र रवींद्र पाटील बाहेरगावी असल्याने ते चर्चेसाठी उपस्थित नव्हते. पक्षाच्या झालेल्या या बैठकीत पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता असताना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. त्यामुळे या मतदार संघातील उमेदवाराचे नाव आज जाहीर होऊ शकलेले नाही. ऍड पाटील यांच्या मागणीचा पक्षातर्फे विचार झाल्यास उमेदवारीचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

माझी उमेदवारीची मागणी कायम 

दरम्यान, रावेर लोकसभा मतदार tउमेदवारीसाठी इच्छुक असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची सुरुवातीपासून केलेली मागणी आजही कायम ठेवली आहे. पक्ष निर्णय घेईल तो आपणास मान्य राहील. 

 ----- ऍड रवींद्र भैय्या पाटील.